
माणुसकीचा ओलावा हरवत चाललेल्या काळात नंदुरबारच्या नवापूर महामार्गावर एका वकिलाने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. भीषण अपघातात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आणि मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या धुळ्याच्या तीन तरुणांना शिरपूरचे ॲडव्होकेट अविनाश पाटील यांनी स्वतःच्या खाजगी वाहनातून रुग्णालयात पोहोचवून जीवदान दिले. त्यांच्या या समयसूचकतेची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी घेत त्यांना २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरविले आहे.
नवापूर शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अपेक्स हॉटेलजवळ आयशर टेम्पो आणि मालवाहू ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की वाहनांचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता. या अपघातात धुळे येथील रहिवासी असलेले योगेश राजेंद्र माळी, राकेश भील आणि आजेश हे तिघे तरुण गंभीर जखमी झाले. त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. ते मदतीसाठी याचना करत होते. यावेळी महामार्गावर मोठी गर्दी जमली होती. अनेकजण मोबाइलमध्ये व्हिडीओ काढण्यात मग्न होते, पण मदतीसाठी कोणीही जात नव्हते.
त्याच वेळी शिरपूरचे रहिवासी असलेले ॲड. अविनाश पाटील हे आपल्या खाजगी कामानिमित्त या मार्गावरून जात होते. गर्दी आणि अपघात पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली कार थांबवली. जखमींची गंभीर अवस्था पाहून त्यांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता लोकांच्या मदतीने तिघांनाही आपल्या आलिशान कारच्या मागील सीटवर घेतले. स्वतःच्या गाडीच्या सीटला रक्त लागेल, याचा जराही विचार न करता त्यांनी गाडी नवापूर उपजिल्हा रुग्णालयाकडे वेगाने वळवली.
दवाखान्यात पोहोचल्यानंतर त्यांनी स्वतः डॉक्टरांना विनंती करून तातडीने उपचार सुरू करण्यास सांगितले. त्यांना वेळीच उपचार मिळाल्याने या तिन्ही तरुणांचे प्राण वाचले. या अपघाताची माहिती मिळताच नंदुरबारचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) उत्तम जाधव यांनी तातडीने नवापूर रुग्णालय गाठले. ॲड. पाटील यांनी केलेल्या मदतीची माहिती मिळताच जाधव भारावून गेले. शासनाच्या मदत करणारा नागरिक धोरणांतर्गत आणि माणुसकीच्या नात्याने उत्तम जाधव यांनी स्वतःच्या वतीने ॲड. अविनाश पाटील यांना २५,००० रुपयांचे रोख बक्षीस आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात ॲड. अविनाश पाटील यांच्या संवेदनशीलतेचे आणि धाडसाचे मोठे कौतुक होत आहे. वकिली व्यवसायातून न्याय देणारा हात आज जीव वाचवण्यासाठी धावून आला, अशी चर्चा परिसरात रंगली आहे.