तर सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री? अजितदादांनंतर नव्या नेतृत्त्वाविषयी मोठं भाकित; काय घडू शकतं?

अजित पवार यांच्या निधनानंतर आता राज्याचा पुढचा उपमुख्यमंत्री कोण होईल, अशी चर्चा चालू झाली आहे. सोबतच राष्ट्रवादी पक्षाचा प्रमुख कोण होणार? असेही विचारले जात आहे.

तर सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री? अजितदादांनंतर नव्या नेतृत्त्वाविषयी मोठं भाकित; काय घडू शकतं?
SUPRIYA SULE
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 29, 2026 | 4:09 PM

Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यावर 29 जानेवारी रोजी बारामती तालुक्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अशा अचानकपणे जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. वक्तशीरपणा, धडाधड निर्णय घेण्याची क्षमता, सडेतोड बोलण्याचे कसब यामुळे अजित पवार यांची संपूर्ण महाराष्ट्रात कायम कार्यरत राहणारा नेता अशी ओळख होती. त्यांच्या अचानक निधनानंतर महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. असे असतानाच आता अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण, तसेच त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे काय होणार? असे प्रश्न विचारले जात आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांच्यानंतर आता राज्याचा नवा उपमुख्यमंत्री कोण होणार? असाही प्रश्न विचारला जातोय. असे असतानाच आता रजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी नेमकं काय घडू शकतं? सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होऊ शकतात का? यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

तातडीने उपमुख्यमंत्री करणं हा पर्याय असू शकतो

सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी पक्षाला स्वत:च्या पायावर उभं राहावं लागेल. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचाही पर्याय आहे. मला असं वाटतं की दोन्ही पक्ष एकत्र येतील. कार्यकर्ते एकत्र आले होते. फक्त नेत्यांनी निर्णय घ्यायचा होता. सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थान काय राहील हा महत्त्वाचा प्रश्न आहे. महत्त्वाचे म्हणजे सुनेत्रा पवार यांना राजकारणाचा, मंत्रिपदाचा अनुभव नाही. सुनेत्रा पवार यांची वाढ आणि विकास राजकीय घराण्यात झाला आहे. सुनेत्रा पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्री करणं हा पर्याय असू शकतो. मात्र दोन्ही काँग्रेस एकत्र आले तर आमदार जयंत पाटील किंवा खासदार सुप्रिया सुळे यांचा विचार केला जाऊ शकतो, असा अंदाज संजीव उन्हाळे यांनी व्यक्त केला. तसेच आठ एक दिवस गेल्यानंतर सगळा उलगडा होईल, असेही पुडे उन्हाळे म्हणाले.

सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांना संधी दिली पाहिजे

अजितदादा राष्ट्रीय स्तरावरचे अध्यक्षपद, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्रिपद अशी महत्त्वाची पदं व्यवस्थित सांभाळत होते. हे सगळं सुनेत्रा पवार यांना पेलणे शक्य नाही. त्यामुळे त्या राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष होतील किंवा उपमुख्यमंत्री होतील. मात्र हे सगळं भाजपाच्या छत्रछायेखाली होईल, असा कयासही संजीव उन्हाळे यांनी लावला. अजितदादांची विचारसरणी कायम ठेवायची असेल तर सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांना संधी दिली पाहिजे. ती संधी दिली तर दादांचा ठसा पक्षावर कायम राहील. महत्वकांक्षा सगळ्यांना आहे. खासदार सुनील तटकरे यांना महत्त्वकांक्षा नाही असं नाही. छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी अजितदादांसोबत काम केलेलं आहे, असे म्हणत राष्ट्रवादी पक्षात अनेकजण उपमुख्यमंत्रिपदासाठी उत्सुक असू शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, आता राजकीय घडामोडींना वेग आला असून भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.