
अंबरनाथ : अंबरनाथचे शिंदे समर्थक गटातील शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर (Dr. Balaji Kinikar) हे फ्लोअर टेस्ट होताच पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. काल पाण्याखाली गेलेल्या अंबरनाथच्या कल्याण कर्जत राज्य महामार्गा (State Highway)ची आज आमदारांनी अधिकाऱ्यांसह पाहणी (Inspection) केली. अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत महामार्गावर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचलं होतं. डीएमसी कंपनी, विमको नाका भागात तर या महामार्गाला नदीचं स्वरूप आलं होतं. या पार्श्वभूमीवर आज सकाळीच अंबरनाथमध्ये परतलेले आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अंबरनाथ नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन या रस्त्याची आणि बाजूला असलेल्या नाल्यांची पाहणी केली.
नाल्यांवर असलेल्या काही अतिक्रमणांमुळे काही ठिकाणी नाला अरुंद झाला असून याबाबत पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. तसंच शहरातील बी केबिन रोड परिसरातील नाल्याच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असं आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सांगितलं. तर कालच्या पावसामुळे नाल्यात अनेक ठिकाणचा कचरा वाहून आल्यानं नाला तुंबला आणि पाणी रस्त्यावर आल्याचं अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी सांगितलं.
अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर हे शिंदे समर्थक गटात सामील झाले असून सूरत, गुवाहाटी, गोवा इथं शिंदे यांच्यासोबत मुक्काम करून फ्लोअर टेस्ट आटोपल्यानंतर आजच सकाळी ते मतदारसंघात परतले आहेत. मतदारसंघात आल्या आल्या आमदार थेट रस्त्यावर उतरले असून नागरिकांना कोणताही त्रास होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.