Rahul Shewale : भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्या; खासदार राहुल शेवाळेंची शिवसेनेविरोधात उघड भूमिका?

Rahul Shewale : आपल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या संवेदनशील सामाजिक आणि यशस्वी राजकीय वाटचालीची प्रशंसा केली आहे.

Rahul Shewale : भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्या; खासदार राहुल शेवाळेंची शिवसेनेविरोधात उघड भूमिका?
भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्या; खासदार राहुल शेवाळेंची शिवसेनेविरोधात उघड भूमिका
Image Credit source: tv9 marathi
भीमराव गवळी

|

Jul 05, 2022 | 7:20 PM

मुंबई: एकनाथ शिंदे  (eknath shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी केलेलं बंड ताजं असतानाच आता शिवसेनेचे (shivsena) खासदार राहुल शेवाळे (rahul shewale) यांनी शिवसेनेच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा द्या, अशी मागणीच राहुल शेवाळे यांनी केली आहे. राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच शेवाळे यांच्या भूमिकेवरही तर्कवितर्क लढवले जात आहेत. शेवाळे यांच्या या मागणीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. दोन दिवसांपूर्वीच भाजपच्या एका नेत्याने शिवसेनेचे 14 खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर शेवाळे यांनी थेट पक्षाच्या लाईनविरोधातच भूमिका घेतल्याने राजकीय शंकाकुशंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आदिवासी समाजातील सक्षम आणि कतृत्त्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याविषयीचे पत्र खासदार शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेऊन त्यांना सादर केले. मात्र, या पत्रावर उद्धव ठाकरे यांनी काही प्रतिक्रिया दिल्याबाबतची माहिती मिळू शकली नाही.

बाळासाहेबांचा कित्ता गिरवा

आपल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या संवेदनशील सामाजिक आणि यशस्वी राजकीय वाटचालीची प्रशंसा केली आहे. तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षीय राजकारणाला छेद देत, महाराष्ट्राची कतृत्त्ववान महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावी, याच हेतूने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दर्शविला होता. तसेच दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कर्तृत्वाचा आदर करत त्यावेळी देखील शिवसेनेने त्यांना पाठिंबा दर्शविला होता. हीच परंपरा कायम ठेवत, आदिवासी समाजातील एका कतृत्त्ववान महिलेचा सन्मान करण्यासाठी शिवसेना पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा आणि त्यासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना आदेश द्यावा, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी पक्षप्रमुखांकडे केली आहे.

शिवसेना सिन्हांच्या पाठी

शिवसेनेने यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठवरण्यासाठी यूपीएच्या बैठका पार पडल्या. या बैठकांना शिवेसनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिवसेना नेते सुभाष देसाई या बैठकांना हजर होते. यूपीएच्या नेत्यांनी आधी काही नावांवर विचार केला. त्यानंतर यशवंत सिन्हा यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केला. सिन्हा यांनी राष्ट्रपतीपदासाठी अर्जही दाखल केला. तोपर्यंत शिवसेनेतून कुणीही सिन्हा यांच्या उमेदवारीला विरोध केला नव्हता. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातात पत्रं देऊन सिन्हांऐवजी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें