
Raigad : सूड उगवण्याच्या भावनेतून, खजिना शोधण्यासाठी तसेच आयुष्यात काही चमत्कार व्हावा या लालसेतून अनेकजण अंधश्रद्धेच्या आहारी पडतात. काही ठिकाणी तर चमत्कार होण्याची आशा धरून भयंकर प्रकार केल्याचे समोर आलेले आहे. अंधश्रद्धेला बळी पडल्यामुळे अनेक कोवळ्या जीवांचाही काही नराधमांनी बळी घेतल्याची काही उदाहरणं आहेत. दरम्यान, अंधश्रद्धेपासून दूर राहा असे सांगितले जात असताना रायगड जिल्ह्यात मोठा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे स्मशानभूमीत जादूटोण्याचे एक अचंबित करणारे प्रकरण समोर आले असून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कर्जत तालुक्यातील हालीवली गावातील आहे. या गावातील स्मशानभूमीत जादूटोणा करताना काही लोकांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी त्यांनी हा अघोरी प्रकार केला आहे. यातील काही लोकांना पकडण्यात आले असून पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
गुरुवारी रात्री सुमारास आदिवासी वाडीतल्या स्मशानात काही अनोळखी इसम संशयास्पद हालचाली करत होते. ही बाब तेथील स्थानिक लोकांच्या नजरेत आली. त्यानंतर काही लोकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तिथे नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिथे गेल्यानंतर स्मशानात धाव घेतल्यानंतर समोर अघोरी जादूटोण्याचा प्रकार चालू असल्याचे समाजले. हा प्रकार समोर येताच स्थानिकांनी जादूटोना करणाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांनी दोन इसमांना पकडून चांगलाच चोप दिला. तर इतर चारजण तेथून पसार झाले. स्थानिकांनी पकडलेल्यांमध्ये एक शिंदे नावाची स्थानिक व्यक्ती आहे. तर दुसरी व्यक्ती सुधागड तालुक्यातील असल्याची माहिती आहे.
दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर आजही समाजात अंधश्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे,हे एका प्रकारे समोर आले आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत असून फरार झालेल्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा तसेच या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. तसेच आयुष्यात चमत्कार घडत नसतो. पैशांचा पाऊस ही एक काल्पनिक संकल्पना आहे. कठोर मेहनत घेऊनच पैसा कमवता येतो. कोणीही अशा अघोरी प्रकाराला बळी पडू नये. तसेच आढळून आल्यास कायद्यानुसार शिक्षा होते, असे या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, प्रशासनाकडून सांगितले जात आहे.