अहमदनगर हादरलं! शिवसेना नगरसेवकाच्या छातीला गावठी कट्टा लावला, अन्… पारनेरमध्ये खळबळ!
Yuvraj Pathare Firing case Parner : महाराष्ट्रामध्ये भर दिवसा होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. जळगावमध्ये नगरसेवकावर झालेल्या हल्ल्यानंतर आता पारनेरमध्ये असाच प्रकार घडला आहे.

अहमदनगर | राज्यात गोळीबाराच्या घटना चर्चेत असताना अहमदनगर जिल्ह्यात पारनेरमध्ये भरदिवसा नगरसेवकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आरोपी हा अल्पवयीन असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पठारे यांच्यावर झालेल्या कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली आहे. गावठी कट्ट्याच्या या हल्ल्यामध्ये वापर करण्यात आला होता. पोलिसांनी कट्टा ताब्यात घेतला आहे.
नेमकं काय घडलं?
पारनेर शहरातील मुख्य स्थानकाच्या परिसरातील हॉटेल दिग्विजयमध्ये युवराज पठारे आपल्या समर्थकांसोबत येत होते. युवराज यांच्या येण्याआधीच काही तरूण त्या ठिकाणी येऊन बसले होते. ज्यावेळी पठारे हॉटलेमध्ये आले तेव्हा तिथेच बसलेल्या तरूणांपैकी एकाने उठून गावठी कट्टा पठारे यांच्या छातीला लावला. पिस्तुलाचा खटका आरोपीने दाबला मात्र फक्त आवाज झाला गोळी चालली नाही. त्यानंतर पठारे यांच्या समर्थकाने कट्टा हिसकावून घेतला.
युवराज पठारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी रांजणगाव मस्जिद येथील अल्पवयीन तरुण असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीसोबत असलेले दोघेजण तिथून पळून गेले. उपस्थितांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांकडे दिलं आहे. पोलीस आता चौकशी करत असून या हल्ल्यामागचं कारण काय? कोणाच्या सांगण्यावरून त्याने हल्ला केला का? याची चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी युवराज पठारे यांच्याची संपर्क साधत चौकशी केली. राज्यात गुन्हागारांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे. ज्याच्या मनात येईल तो उठून थेट गोळीबार करत आहे, कायद्याचा कसलाही धाक या आरोपींना राहिला नाही. या प्रकरणात पोलीस तपासात कोणते खुलासे होतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
