
कर्जत-जामखेड मतदारसंघातील कामानिमित्ताने आमदार रोहित पवार एका अधिकाऱ्यावर चांगलेच संतापले. “पैसा तुमच्या बापाचा नाही. माज दाखवू नको” असा संताप त्यांनी व्यक्त केला खरा, पण आता त्यामुळे त्यांच्या विरोधकांना आयातं कोलीत मिळालं आहे. पवारांच्या या वक्तव्यावर त्यांनी टीका सुरू केली आहे. रोहित पवार हे अधिकाऱ्यांना दमदाटी करत असल्याचा आरोप विरोधकांनी सुरू केला आहे. तर दुसरीकडे नागरिकांनी रोहित पवारांच्या कृतीचं स्वागत केलं आहे. काही अधिकारी वेळेत कामच करत नसल्याची तक्रार नागरिकांची होती. पवारांनी जागेवरच अनेक तक्रारी, अडचणी आणि कामे मार्गी लावल्याचे कौतुक नागरिकांनी केले आहे.
सलग 8 तास आमसभा
गुरुवारी कर्जत येथे आमसभा आयोजित करण्यात आली होती. सलग 8 तास आमसभा घेऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यात आल्या. त्यानंतर शुक्रवारी जामखेड येथेही रोहित पवार यांनी दुपारी 12 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांच्या समस्या, अडचणी ऐकून घेतल्या. त्यांनी जागेवरच प्रश्न सोडवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. प्रांताधिकारी, बीडीओ, नायब तहसीलदार यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी रोहित पवारांचा पारा अनेकदा चढल्याचे दिसले. तर काही वेळा त्यांनी परिस्थितीत संयमाने हातळली. नागरिकांना त्रास देऊ नका असे त्यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले.
अधिकाऱ्याला झाप झाप झापले
एका चेम्बर-ड्रेनज लाईन प्रकरणी नागरिकांनी अधिकारी काम करत नसल्याची तक्रार करत होते. अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यानेच निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे होते. अधिकारी बदली होऊन जातील. पण पुढील 30-35 वर्ष त्याचा त्रास नागरिकांना भोगावा लागतो असे नागरिकांचे म्हणणे होते. त्यावर अधिकारी तक्रारकर्त्याला हा फोटो कधीचा आहे असे विचारत दोघेही तिथे जाऊन पाहणी करु असे म्हणाला. त्यानंतर आमदार रोहित पवारांचा संताप अनावर झाला. त्यांनी अधिकाऱ्याला झाप झाप झापले.
पैसा तुमच्या बापाचा नाही, माज दाखवू नको
“ये आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? हे फोटो दाखवत आहेत, हे खोटं आहे का? ही वेडी लोकं आहेत का? खिश्यातून हात काढ आधी, लै शहाणा काम करतोय तू. मिजासखोर तू बोलू नकोस, तुला सांगतोय. या लोकांनी दाखवलेले काम हे आमच्याकडं आलेले आहे. हे काम तपासले. ते खराब क्वालिटीचं झालंय. हा तुमच्या बापाचा पैसा नाही. हा लोकांचा पैसा आहे. तू कुठलाही अशील,इथं यांना राहायचंय. या लोकांनी दाखवलेलं काम हं खराब झालंय. उद्या बघतो, करतो असे काय सांगता. तुमचे आणि तुमच्या अधिकाऱ्यांचे पराक्रम आम्हाला माहिती आहेत.” असा संताप आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला. त्यांनी अनेक कामं तातडीनं मार्गी लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांनी रोहित पवारांच्या कामाचं कौतुक केलं. अधिकाऱ्यांना अशीच भाषा कळतेची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. तर विरोधकांनी, लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची कामं करवून घेणे हे प्रत्येक आमदाराचं कर्तव्यच आहे. पण एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला अशी भाषा वापरणं योग्य नसल्याचे म्हटलं आहे.