
देश-परदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगापूर ट्रस्टला अखेर देवभाऊंच्या सरकारने जोरदार दणका दिला. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या ट्रस्टने 500 कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला होता. तर राज्य सरकारने शनिशिंगणापूर मंदिर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची घोषणा शुक्रवारी विधानसभेत केली. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. भाविकांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या विश्वस्तांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. श्रद्धेच्या बाजाराआड स्वतःची पोळी भाजणाऱ्यांवर कारवाईवर भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.
विश्वस्तांच्या पाठी साडेसाती
देवाच्या नावावर घोटाळे करणाऱ्यांना सोडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. विश्वस्तांच्या अपसंपदेची, संपत्तीची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. या भ्रष्टाचारप्रकरणी विश्वस्तच नाही तर इतर अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही कारवाईची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. घोटाळ्याचे हे रॅकेट मोठे असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे. आता शनिची साडेसातीच या विश्वस्तांच्या आणि घोटाळेबाजांच्या पाठी लागल्याचे समोर येत आहे.
कसा केला घोटाळा
स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी याविषयीची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यांनी महाघोटाळ्याची माहिती पटलासमोर मांडली. कथित आरोपांनुसार, विस्वस्तांनी बनावट ॲप तयार केले. जगभरातील लाखो भाविकांकडून पूजेसाठीच्या देणग्या त्यावर स्वीकारल्या. असे एक नाही तर 3-4 ॲप तयार करण्यात आले होते. या बनावट ॲपवर तीन ते चार लाख भक्तांनी पैसे पाठवले. संस्थानमधील बोगस भरती प्रक्रियेवर सुद्धा लंघे यांनी बोट ठेवले. आमदार लंघे यांच्या मते हा घोटाळा 100 कोटींचा तर आमदार सुरेश धस यांच्या मते हा घोटाळा 500 कोटींचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शिर्डीच्या धरतीवर समिती
पंढरपूरमधील श्री विठ्ठल देवस्थान, शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानच्या धरतीवर शनिशिंगणापूर मंदिराच्या संचालनासाठी शासकीय समिती करण्याचा निर्णय ही विधीमंडळाने घेतला. त्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर या घोटाळ्याच्या चौकशीसाठी बाहेरचे अधिकारी नेमण्यात येणार आहेत. तर धर्मादायचे अधिकारी सुद्धा या कारवाईने रडारवर आले आहेत. त्यांच्यावरती सुद्धा कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.