आता मी शांत नाही बसणार, यापुढे.. जिवंतपणी श्रद्धांजलीची पोस्ट व्हायरल झाल्याने आमदार अमोल खताळांचा संताप
MLA Amol Khatal: आमदार खताळ यांच्या श्रद्धांजलीचे पोस्टर टाकल्याने राजकारण तापले आहे. यामुळे संतापलेल्या खताळ यांनी संबंधित दोषींविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील वातावरण यामुळे तापले आहे.

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांचेबाबतची भावपूर्ण श्रद्धांजली अशी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. खताळ यांनी बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. या पोस्टचा निषेध करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार खताळ यांनी काहींच्या जिव्हारी पराभव लागल्याने असा प्रकार केल्याचा आरोप केला आहे. यावरून अहिल्यानगर जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील वातावरण तापले आहे. खताळ हे काँग्रेसचे मोठे नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करत निवडून आले होते.
आता मी शांत बसणार नाही
लोकप्रतिनिधीच्या निधनाची खोटी श्रद्धांजली सोशल मीडियावर पोस्ट करणं, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे… माझी बदनामी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात असून, आता मात्र मी शांत बसणार नाही संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर नोटीस बजावून गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे. तसेच हा सगळा प्रकार केवळ पराभव जिव्हारी लागल्यामुळे सुरू असल्याचा आरोपही खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केला आहे.
राजकारण खालच्या पातळीवर
आमदार खताळ यांनी या मुद्दावर पत्रकार परिषद घेतली. मी कायद्याचा सन्मान करतो म्हणून आतापर्यंत शांत आहे. मात्र, संगमनेरचे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर गेले आहे. नाहक माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. आता मात्र मी शांत बसणार नाही. या प्रकारामागे कोण कोण आहेत, याचा शोध घेणार असल्याचे ते म्हणाले.
लोकप्रतिनिधीविरोधात भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट टाकण्यात येते. ही अत्यंत गंभीर बाब आहे. पराभव जिव्हारी लागल्यानेच हे उद्योग सुरू झाले आहेत. संबंधित व्यक्तीशी माझे कोणतेही संबंध नाहीत. त्याच्याशी माझा कोणताही आर्थिक व्यवहार नाही. हा प्रकार मी आमदार होण्यापूर्वीचा आहे. पण आमदार झाल्यानंतर तो आता उकरून काढण्यात आला आहे. मला कोणालाही एक रुपया देणे नाही आणि कोणाकडून एक रुपया घेणे नाही. या संपूर्ण प्रकरणामागे कोणाचा हात आहे हे मी शोधून काढणार आहे, असे आमदार अमोल खताळ म्हणाले.