ऐरोली ते बेलापूर…रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट; नागरिकांचा प्रवास होणार सुखकर? महत्त्वाची अपडेट समोर
navi mumbai railway : नवी मुंबईतील ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा कायपालट होण्याची शक्यता आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या भेटीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मध्य रेल्वे प्रशासनाला आदेश दिले आहेत.

नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. आता लवकरच ऐरोली ते बेलापूरदरम्यान सर्व स्थानकांचा कायापालट होण्याची शक्यता आहे. स्थानकांचा कायापालट व्हावा, यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्निनी वैष्णव यांची भेट घेतली. रेल्वे स्टेशनची विकामकामे तातडीने मार्गी लावावीत. प्रवाशांना मूलमूत सुविधा मिळाव्यात, या मागण्या खासदार म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केल्या. यानंतर केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ही विकासकामे तातडीने करण्याचे निर्देश दिलेत.
नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या प्रवाशांची खासदार नरेश म्हस्के यांनी गंभीर दखल घेतली. बेलापूर ते ऐरोली ही सर्व स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित झाली आहेत. यात ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, सीवूड्स-दरावे आणि बेलापूर या स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांची देखभाल आणि दुरुस्ती, मूलभूत सुविधा आता मध्य रेल्वे प्रशासन देणार असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निर्दशनास आणून दिलंय.
नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या समस्या काय?
ऐरोली आणि रबाळे येथे तिकीट खिडक्या बंद आहेत. तसेच स्टेशनवरील शौचालये जीर्ण अवस्थेत आहेत. त्याचबरोबर पायऱ्या आणि फरश्या तुटल्याचे दिसत आहे. घणसोली आणि कोपरखैराणे येथे प्रचंड वर्दळ असते. त्यानंतरही तिकीट काउंटर अस्वच्छ असात. तिकडे सर्वत्र धूळ साचलेली पाहायला मिळते. तुर्भे आणि सानपाडा स्थानकांत शौचालयांमध्ये तीव्र दुर्गंधी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कमतरता पाहायला मिळते.
शौचालयात लाईट नाही.
जुईनगर आणि नेरुळ रेल्वे स्थानकात पादचारी पुलांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यात काही खिडक्या बंद असल्यामुळे तिकिटांसाठी लांबच लांब रांग लागते. सीवूड्स-दरावे आणि बेलापूर रेल्वे स्थानकांमध्येही स्वच्छतेचा आभाव पाहायला मिळतो. सर्व स्थानकांतील पायऱ्या आणि पादचारी पुलांची,बसण्याच्या बाकांची तात्काळ दुरुस्ती करावी, शौचालयांचे नूतनीकरण आणि २४ तास स्वच्छता, पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, सर्व तिकीट खिडक्या सुरू कराव्यात. स्थानकात पुरेसे एलईडी दिवे लावावेत, रात्रीच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांची गस्त वाढवावी, या प्रमुख मागण्यांची पुर्तता करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्केंनी केली.