…तरच सुप्रिया सुळे यांच्याकडून राखी बांधून घेईन, रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार हे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत रक्षाबंधन साजरी करणार का? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

राज्यभरात रक्षाबंधनाचा उत्साह आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व बाजारपेठांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. ही राखी खूप पवित्र मानली जाते. राज्यात घराघरात हा सण साजरा केला जातो. दरवर्षी अनेक सेलिब्रिटी रक्षाबंधन साजरी करतात आणि सोशल मीडियावर फोटो शेअर करतात. चित्रपट अभिनेता, अभिनेत्री यांच्याप्रमाणेच राजकीय नेतेमंडळींच्या रक्षाबंधनाकडेही नागरिकांचं लक्ष असतं. राज्याच्या राजकारणात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचं मोठं नाव आहे. शरद पवार यांचं संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे सर्व सण साजरी करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असली तरीही दिवाळीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र दिवाळी साजरी केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यामुळे आता अजित पवार हे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत रक्षाबंधन साजरी करणार का? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
“मी उद्या मुंबईला आहे. सुप्रिया उद्या मुंबईला असेल तर मी तिच्याकडे जावून राखी बांधेन. मी मुंबईला आहे. माझे मुंबईत कार्यक्रम आहेत. माझी सकाळपासून बैठक आहे. त्यामुळे मुंबईत माझ्या जेवढ्या बहिणी उपलब्ध असतील त्यांच्याकडे दावून मी राखी बांधून घेईन”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांच्या या वक्तव्यानुसार, सुप्रिया सुळे उद्या मुंबईत असल्या तर दोन्ही बहीण-भाऊ रक्षाबंधन सण साजरी करणार आहेत. पण सुप्रिया सुळे या उद्या नाशिक दौऱ्यावर असल्याची माहिती मिळत आहे.
जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले…
यावेळी अजित पवार यांना पत्रकारांनी त्यांचे चिरंजीव जय पवार यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. “जय पवारांनी बैठकांचं सत्र सुरु केलं आहे तर आपल्याला का वाईट वाटतं? जर एखादा मुलगा स्वातंत्र्य विचारांचा आहे, त्याने बैठका सुरु केल्या तर मी विरोध करायचं कारण नाही”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
जय पवार विधानसभेच्या निवडणुकीत उतरतील का? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मी काही ज्योतिषी नाही. मी तुमच्याशी बोलत नाही त्याचं कारणच हे आहे. मी सांगतो काय आणि तुम्ही… तुम्ही मला राज्याचं विचारा, विकासाचं विचारा, योजनांबद्दल विचारा. तुम्हाला ब्रेकिंग न्यूज लागतात. मला त्याच अजिबात स्वारस्य नाही. मी जनसन्मान यात्रा सुरु झाल्यापासून एका तरी विरोधकावर टीका केली का? ते मला सांगा”, असं अजित पवार म्हणाले.
“जुलै महिन्यात ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरले त्यांना लाभ सुरु झालेला आहे. आता हे जसे उरकतील तसे ऑगस्टे अर्ज पाहिले जातील. प्रक्रिया आहे. अर्जाची छाननी केली जाते. आधारकार्डशी ते लिंक केलं जातं. आम्ही मध्यंतरी घाई करायचा प्रयत्न केला तर एका महिलेने दुसऱ्या पुरुषाच्या बँक खात्याची माहिती दिली. त्यामुळे त्या पुरुषाच्या बँक खात्यात पैसे गेले”, असं अजित पवारांनी सांगितलं.