
माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस सुरक्षा गृह विभागाने काढली आहे. सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या अहवाला नंतर हा निर्णय घेण्यात आला. अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा कालावधी संपल्यानंतर वाय प्लस सुरक्षा काढून घेण्यात आली. याच मुद्यावरून बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला टोला लगावला आहे. मालेगाव कोर्टात हजर होण्यापूर्वी ते माध्यमांशी संवाद? साधत होते. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता,त्यासंदर्भातील सुनावणीसाठी ते मालेगावात होते. सुनावणीपूर्वी ते विविध मुद्यांवरून माध्यमांशी बोलले, तेव्हाच त्यांनी भाजपावर टीका केली. संघ आणि भाजपवाल्यांना अजिबात धोका नाही. त्यांना कोणी चापटीही मारणार नाही. निरर्थक लोकं आहेत ते, अशा शब्दांत राऊतांनी टीकास्त्र सोडलं.
काय म्हणाले राऊत ?
खरं सांगायचं तर कोणीही, सेक्युरिटीची फार सोस धरू नये. या देशात फक्त भाजप आणि संघाच्या लोकांनाच धोका आहे. त्यामुळे झेडप्लस, डबल झेड प्लस, एनएसजी कमांडो किंवा सेक्युरिटी त्यांनाच, किंवा शिदेंसोबत जे लोक फुटून गेलेत त्यांनाच सुरक्षेची गरज. बाकी इतर पक्षाचे लोकं निर्भय आहेत. आमच्या आसपास येण्याची कुणाची हिंमत नाही, असं माझं मत आहे, असं राऊतांनी सुनावलं. त्यामुळे सेक्युरिटी ठेवली काय आणि काढली काय त्याचा आम्ही लोकांनी बाऊ करू नये. सेक्युरिटी कुणाला, तर त्यांना ( भाजप- शिंदे गट वगैरे) मिळते. पण संघ आणि भाजपवाल्यांना अजिबात धोका नाही. त्यांना कोणी चापटीही मारणार नाही, निरर्थक लोकं आहेत ते असा टोला राऊतांनी लगावला. पण सुरक्षा घेऊन आम्ही कुणी तरी मोठे आहोत. आमच्या जीवाला किती धोका, आम्ही किती राष्ट्रकार्य करतो हे दाखवत आहेत. त्यांचं राष्ट्र कार्य काय हे दिसतंय अशी टीकाही त्यांनी केली.
आपापसातील गटबाजीमुळे चंद्रपूरच्या राजकारणावर झाला परिणाम
उबाठामुळे चंद्रपुरात महापौर झाला नाही असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते. त्यांच्या या विधानाच राऊत यांनी समाचार घेतला. हे अगदी चुकीचं आहे. आमच्यामुळे काहीही झालेलं नाही, अस त्यांनी स्पष्ट केलं. तुमच्या आपापसातील गटबाजीमुळे हे झालं. आम्ही तुमच्यासोबतच होतो, म्हणूनच दिल्लीमध्ये या दोन्ही गटांना समजावण्यासाठी उच्चपातळीवर बैठक झाली. त्यात त्यांना समज दिली. दोन्ही गट एकत्र आले नाही, त्याचाच परिणाम चंद्रपूरच्या राजकारणावर झाला अशा शब्तांत राऊतांनी स्पष्ट सुनावलं.