MNS Deepotsav : परिस्थिती ओळखून राज ठाकरेंनी दाखवली संवेदनशीलता, शिवाजी पार्कमधल्या दीपोत्सवाबद्दल घेतला मोठा निर्णय
MNS Deepotsav : दरवर्षी दिवाळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दीपोत्सव चर्चेचा विषय असतो. या दीपोत्सवाला तरुणाई मोठ्या संख्येने हजेरी लावत असते. पण यंदा मनसेने शिवाजी पार्कमधल्या दीपोत्सवाबद्दल मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं. मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी केली जाते. वसू बारसपासून शिवाजी पार्कमध्येम मनसेचा दीपोत्सव सुरु होतो. या दीपोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक रोषणाई, लायटिंग. दरवर्षी दिवाळीत ही लायटिंग पाहण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. यात तरुणाईचा सहभाग जास्त असतो. दिवाळी सुरु झाल्यानंतर संध्याकाळच्यावेळी इथे मोठी झुंबड उडते. पाय ठेवायलाही जागा नसते. अबालवृद्ध या दीपोत्सवाचा आनंद घेतात. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणून दिवाळी सणाकडे पाहिलं जातं. मनसेचा हा दीपोत्सव खास असतो. पण हा दीपोत्सव यंदा साजरा होणार नाहीय.
मनसेने दादर शिवाजी पार्क परिसरात रोषणाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ स्थितीमुळे मनसेने हा निर्णय घेतला आहे. रोषणाई आणि आतिशबाजी यावर्षी करणार नसल्याचं मनसेने म्हटलं आहे. शिवाजी पार्क येथे केवळ कंदील लावून साधेपणानं दिवाळी साजरी केली जाणार आहे. या निर्णयामुळे युवा वर्ग थोडा निराश होऊ शकतो. पण महाराष्ट्रातील सध्या दुष्काळाच वास्तव भीषण आहे. एल निनो फॅक्टरमुळे पुरेसा पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांची उभी पिकं नष्ट झाली आहेत. पेरणी करुनही पाऊस नसल्याने शेतीचं नुकसान झालं आहे.
रोषणाई का करणार नाही?
महाराष्ट्रातील अनेक भागात दुष्काळी स्थितीमुळे गंभीर परिस्थिती आहे. अनेक गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नाहीय. जनावरांना खाण्यासाठी चारा नाहीय. आतापासूनच अनेक भागात टँकर लावावे लागत आहेत. पाऊस पडेल याची चिन्ह दिसत नाहीयत. शेतकरी हवालदिल झाला आहे. राजकीय पक्षांनी अशावेळी संवेदनशीलता दाखवणं गरजेचं असतं. अशा कार्यक्रमांमध्ये खर्च होणार पैसा दुष्काळी नियोजनासाठी वापरता येऊ शकतो. त्यामुळे काही कुटुंबांना तरी दिलासा मिळू शकतो. मनसेने हीच संवेदनशीलता दाखवून रोषणाई आणि आतिशबाजी न करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. मनसेचा दीपोत्सव हा चर्चेचा विषय असतो. दरवर्षी बॉलिवूडमधल्या एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीकडून या दीपोत्सवाचं उद्घाटन होतं.
