सिलेंडर आणण्यासाठी बाहेर पडला, पण घरी परतलाच नाही; वाटेत घडलं असं काही की…
अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे उड्डाणपुलाचा लोखंडी तराफा अंगावर कोसळून ३४ वर्षीय ईश्वर भूरभुरे या तरुणाचा मृत्यू झाला. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे घडलेल्या या घटनेमुळे दाभेरी परिसरात संतापाची लाट असून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.

राज्यात सध्या ठिकाठिकाणी विकासकामे सुरु आहेत. मात्र या विकासकामांच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यात समोर आला आहे. रिद्धपूर येथील तिवसा महामार्गावर रेल्वे क्रॉसिंगवर निर्माणाधीन असलेल्या उड्डाणपुलाचा लोखंडी तराफा (Iron Raft) अंगावर कोसळल्याने एका ३४ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ईश्वर भूरभुरे असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकी घटना काय?
श्री क्षेत्र रिद्धपूर येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक २३ वर ‘आर.व्हि.एस. कन्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीमार्फत गेल्या एका वर्षापासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. गुरुवारी ईश्वर भूरभुरे हे आपल्या मित्रासह दुचाकीवरून घरगुती गॅस सिलेंडर आणण्यासाठी रिद्धपूरकडे जात होते. ते उड्डाणपुलाखालून जात असताना, वर सुरू असलेल्या कामातील एक जड लोखंडी तराफा अचानक निखळला. तो थेट ईश्वर यांच्या डोक्यावर कोसळला. हा आघात इतका भीषण होता की ईश्वर जागीच बेशुद्ध पडले.
यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने चांदूर बाजार येथील रुग्णालयात हलवले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यासोबत असलेला मित्र सुदैवाने या अपघातातून थोडक्यात बचावला.
सध्या जागतिक स्तरावर इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे इंधन आणि एलपीजी सिलेंडरचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच भीतीपोटी आणि स्थानिक पातळीवर सिलेंडरची उपलब्धता कमी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ईश्वर हे लांबचा प्रवास करून सिलेंडर आणण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र घराची चूल पेटवण्यासाठी निघालेल्या या तरुणाला यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूने गाठले, ही बाब ग्रामस्थांच्या मनाला चटका लावून जाणारी ठरली आहे.
कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची मागणी
उड्डाणपुलाचे काम सुरू असताना खालील वाहतूक सुरू ठेवणे आणि कोणतीही सुरक्षा जाळी किंवा बॅरिकेड्स न लावणे, हा कंत्राटदाराचा अक्षम्य गुन्हा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सामान्य माणसाचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? असा संतप्त सवाल दाभेरी आणि रिद्धपूर येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत संबंधित कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
