अमरावतीत 75 वर्षीय उपोषणकर्त्या शांताबाईंचा मृत्यू, मागण्या अद्याप अपूर्ण, नेमके काय घडले?

अमरावती येथील प्रलंबित मागण्यांसाठीच्या आंदोलनात उपोषणकर्त्या शांताबाई उकर्डा यांचे निधन झाले. त्यांच्या मागण्यांमध्ये मुलीला अनुकंपा नोकरी व वडिलोपार्जित घराचा समावेश होता. मृतदेहाचा वापर आंदोलनासाठी होऊ नये म्हणून पोलिसांनी तो ताब्यात घेतला,

अमरावतीत 75 वर्षीय उपोषणकर्त्या शांताबाईंचा मृत्यू, मागण्या अद्याप अपूर्ण, नेमके काय घडले?
| Updated on: Oct 14, 2025 | 8:19 AM

विविध प्रलंबित मागण्यांसाठी अमरावती जिल्हा कचेरीलगत अनेक दिवसांपासून धरणे आंदोलन आणि उपोषण सुरु आहे. या आंदोलनकर्त्या ७५ वर्षीय शांताबाई उकर्डा यांचा उपचारादरम्यान सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्याचा इशारा राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप काकडे यांनी दिला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच मृतदेहाची अवहेलना टाळण्याच्या कारणावरून गाडगे नगर पोलिसांनी रात्री उशिरा उपोषण मंडपातून मृतदेह ताब्यात घेतला.

मागण्या काय?

शांताबाई उकर्डा आणि त्यांची मुलगी विजया उकर्डा यांच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने यापूर्वीच काही आदेश दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी अमरावती महापालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक टाळत असल्याचा आरोप दिलीप काकडे यांनी निवेदनात केला आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये विजया उकर्डा यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी आणि शांताबाईंचे आईचे घर त्यांना पूर्वीप्रमाणे परत देण्यात यावे यांचा समावेश होता. यासोबतच, मनपाचे विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण आणि क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र देवरणकर यांना त्यांच्या कार्यपद्धतीमुळे सेवामुक्त करण्याची मागणीही उपोषणकर्त्यांनी केली होती.

आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता

दीर्घकाळ चाललेल्या उपोषणामुळे शांताबाई उकर्डा यांची प्रकृती खालावली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या घटनेनंतर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिलीप काकडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास मंगळवारी मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्याचा इशारा दिला होता. ज्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली.

तीव्र संतापाचे आणि नाराजीचे वातावरण

या पार्श्वभूमीवर, मृतदेहाची अवहेलना होऊ नये आणि मृतदेहाचा वापर करून शासकीय कार्यालयासमोर आंदोलन करून शांतता भंग होऊ नये म्हणून गाडगे नगर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. नातेवाईक आणि आंदोलनकर्त्यांच्या ताब्यात असलेला उपोषण मंडपातील मृतदेह पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतला. तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे आंदोलनकर्ते आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संतापाचे आणि नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाने त्वरित त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्ते करत आहेत. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी संयुक्त मोर्चाचे पदाधिकारी बैठक घेत आहेत.