
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. प्रहार संघटना राज्यात चक्काजाम आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी बच्चू कडू यांनी विदर्भात पदयात्रा काढली. त्याचवेळी त्यांनी आंदोलनाची दिशा ठरवली. आता सरकारला आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुरू होणार आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी बच्चू कडू यांनी 8 जूनपासून आंदोलनाचे हत्यार उपासले होते. मोझरी येथील गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीसमोर त्यांचे हे उग्र उपोषण सुरू होते. सरकारच्या यशस्वी मध्यस्थीनंतर 6 दिवसांनी त्यांनी उपोषण मागे घेतले. मंत्री उदय सामंत यांनी मोझरीत येऊन सरकार बच्चू कडू यांच्या मागणीबाबत सकारात्मक असल्याची भूमिका त्यावेळी मांडली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातून सात बारा कोरा करण्यासाठी पदयात्रा काढली.
सरकारलाच वाटते महाराष्ट्र पेटत राहिला पाहिजे
महाराष्ट्रभरात सर्व ठिकाणी चक्काजाम आंदोलन होणार आहे. कर्जमाफीसाठी शेतकरी समोर येत आहे. मच्छीमार दिव्यांग मेंढपाळांचे प्रश्न आहे. सरकार कडूनच दिशाभूल करण्याच काम करत जात आहे. आमचं आंदोलन आता सरकारच्या हातात राहणार नाही. सरकारलाच महाराष्ट्रात अशांतता पाहिजे. सरकारलाच वाटते महाराष्ट्र पेटत राहिला पाहिजे. म्हणूनच कर्जमाफीची घोषणा करत नाही, असा घणाघात बच्चू कडू यांनी घातला.
त्यामुळे बच्चू कडू आता उग्र आंदोलन करणार अशी चर्चा होत आहे. प्रहार संघटनेला विरोधकांनी साथ दिल्यास राज्यात मोठे आंदोलन उभे ठाकण्याची शक्यता आंदोलक व्यक्त करत आहेत. पावसाचा बदलता पॅटर्न, सरकारची धोरण, कृषीमंत्री कायम वादात सापडत असल्याने प्रहारच्या आंदोलनाला धार येण्याची शक्यता आहे. सध्या शेतीची कामे सुरू असली तरी या आंदोलनाला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
सरकारचा दबावतंत्राचा वापर
काल प्रहारच्या दोनशे कार्यकर्त्याना नागपूर मध्ये अटक करून ठेवली आहे. आमच्यावर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. ज्या ठिकाणी पोलीस अधीक्षक आंदोलन करू देणार नाही त्या ठिकाणी आम्ही पुन्हा चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला विविध संघटना, मनसेने पाठिंबा जाहीर केला आहे.