Bachhu Kadu : अन्न सोडलं, आता बच्चू कडू आणखी मोठा निर्णय घेणार? थेट दिले संकेत; कार्यकर्त्यांची अमरावतीत गर्दी वाढली

Bachhu Kadu Big Decision : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजा सातवा दिवस आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यांनी विविध ठिकाणी उग्र निदर्शने आणि आंदोलनाचा बार उडवून दिला आहे. त्यातच बच्चू कडू हे मोठा निर्णय घेण्याचा तयारीत आहेत.

Bachhu Kadu : अन्न सोडलं, आता बच्चू कडू आणखी मोठा निर्णय घेणार? थेट दिले संकेत; कार्यकर्त्यांची अमरावतीत गर्दी वाढली
बच्चू कडू यांचा मोठा निर्णय
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 14, 2025 | 1:23 PM

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजा सातवा दिवस आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यांनी विविध ठिकाणी उग्र निदर्शने आणि आंदोलनाचा बार उडवून दिला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात आंदोलनकर्त्यांचे उग्र रुप दिसून आले. त्यांचा संताप राज्याने पाहिला. त्यातच बच्चू कडू हे मोठा निर्णय घेण्याचा तयारीत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात कालवाकालव सुरू झाली आहे.

बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. आज ते आंदोलन मागे घेण्यासंदर्भात काही भूमिका घेतील असे वाटत असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला आहे. त्यामुळे हे आंदोलन आता वेगळ्या वळणावर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. विरोधी पक्षांनी त्यांच्या पाठीशी पाठिंब्याची मोट बांधली आहे. तर दुसरीकडे अनेक संघटनांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यामुळे अन्नत्यागाची ही लढाई रस्त्यावर आली तर नवल नको.

सरकारच्या वेळकाढू धोरणावर कडू नाराज

कर्जमाफीचा लवकर निर्णय व्हायला पाहिजे होता.कर्जमाफीचा अहवाल केव्हा येणार? कर्जमाफी केव्हा होणार याची तारीख सांगितली नाही. कर्जमाफी बद्दल सरकार बोलायला लागला आहे पण केव्हा करणार हे सांगत नाही. कर्जमाफी केव्हा करणार हा निर्णय झाला नाही, अशी नाराजी बच्चू कडू यांनी व्यक्त केली. त्यामुळे सरकारची मध्यस्थी फोल ठरल्याचे समोर येत आहे. सरकारच्या ठोस प्रस्तावाशिवाय हे आंदोलन मागे हटण्याची चिन्ह नाहीत.

कार्यकर्ते कमी पडणार नाहीत

पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त लावला आहे. मात्र कार्यकर्ते कमी पडणार नाही रोज मेल्यापेक्षा एकदाच मरण परवडलं अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे आज निर्णय होईपर्यंत कार्यकर्त्यांनी कुठलंही आंदोलन करू नये असे आवाहन बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. आज अजितदादांच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळानंतर बच्चू कडू यांची ही भूमिका लक्षणीय आहे.

16 तारखेपासून जलत्याग

आज निर्णय झाला नाही तर 16 तारखेला जलत्याग सुद्धा करणार असल्याची भूमिका कडू यांनी जाहीर केली. त्यामुळे हे आंदोलन अजून चिघळण्याची शक्यता समोर येत आहे. पुण्यातील माझे कार्यकर्ते आक्रमण झाले आहे. माझी तब्येत खालावत आहे सरकार निर्णय घेत नाही म्हणून ते आंदोलन करत आहे. उशीर झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 16 तारखेपासून आता पाणी त्याग करण्याची आमची मानसिकता आहे.

कर्जमाफीसाठी समिती गठीत करू म्हणतात परंतु समिती केव्हा गठीत करणार आणि केव्हा कर्जमाफी होणार हे सांगितलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी शांतता राखावी हे कार्यकर्ते काल अजित दादांच्या घरावरही आंदोलन करणार होते पण त्यांना मी सांगितलं करू नका, असे कडू म्हणाले.

रास्ता रोको आंदोलन

बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ नांदगाव पेठ टोलनाक्यासमोर भीम ब्रिगेडने रास्तारोको आंदोलन केले. आज कुणीही आज आंदोलन करू नये बच्चू कडूंनी आवाहन करुनही आंदोलन सुरूच आहे. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीन आणि कापूस फेकत सरकारचा निषेध केला. बच्चू कडूंच्या फोटोचा दुग्धभिषेक करत रास्ता रोको केला. कर्जमाफीसाठी समिती नको तर तात्काळ कर्जमाफी केली असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करा अशी भीम बिग्रेडने मागणी केली आहे.