Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांना सत्तेचे वेध; पवारांच्या त्या भूमिकेने मोठा पेच
Sharad Pawar NCP MLA : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर एक गट सत्तेत गेला तर दुसरा गट विरोधी बाकांवर आहे. पण विरोधी बाकांवरील आमदारांना सत्तेविना काही चैन पडत नसल्याचे समोर येत आहे. दोन्ही पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच मोठी अपडेट समोर येत आहे.

शिवसेनेनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पण उभी फूट पडली होती. अजितदादांच्या नेतृत्वातील गटाने सत्तेची कास धरली तर दुसरीकडे शरद पवारांचा गट विरोधी बाकांवर बसला. पण या गटातील आमदारांना सत्ता खुणावू लागली आहे. त्यांना विरोधी बाकांची ऊब मानवेना. आता त्यांना जनता आणि कामे आठवली आहेत. त्यांनी सत्तेत जाण्याचा सूर आळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपण सत्तेत भागीदार असायला हवे अशी मागणी या आमदारांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येण्याची चर्चा रंगात आहे. अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे अचूक टायमिंग साधले आहे. तरीही आशेची धुकधूक कायम आहे. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात अशी हलगी वाजली. त्यादृष्टीने दोन्ही राष्ट्रवादीत चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीतील आमदार विरोधी बाकावर अस्वस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना सत्तेचे वेध लागले आहेत. त्यांना आता सत्ता खुणावत आहे. विरोधी बाकावर राहून कामे होत नसल्याची सूर त्यांनी वरिष्ठांसमोर आळवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आमदार अस्वस्थ, खासदार पवारांच्या पाठीशी
मतदारसंघातील कामे होत नसल्याने आमदार अस्वस्थ झाले आहेत. आपण सत्तेत जायला हवे अशी आग्रही मागणी या आमदारांनी शरद पवार यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मतदारसंघातील कामे आणि त्यांना मिळणारा निधी यावरून त्यांनी तक्रारीचा सूर आळवला आहे. सत्तेत असल्यावर निदान कामं तरी करता येईल अशी भूमिका त्यांनी मांडली. तर दुसरीकडे खासदार शरद पवारांच्या पाठीशी असल्याचे दिसून आले. पवार जी भूमिका घेतील, त्याला त्यांचा पाठिंबा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पवारांचा भाजपाशी युतीस नकार
दरम्यान शरद पवार यांनी भाजपासोबत जाण्यास नकार दिला आहे. भाजपासोबत जाण्यास शरद पवार तयार नसल्याचे समोर येत आहे. भाजपासोबत युती करायची नाही असे पवारांचे मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता आमदारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे खासदारांनी मात्र पवारांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.