
बच्चू कडू यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. बच्चू कडू यांना सकाळी रक्ताच्या उलट्या झाल्या. उपचार घेण्यास बच्चू कडू यांनी नकार दिला आहे. कुठलीही सलाईन घेणार नाही अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. कडू यांना कालपासून सतत उलट्या होत आहे. तर दुसरीकडे त्यांच्या प्रकृतीच्या काळजीने कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल पाहायला मिळाली. एका कार्यकर्त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे आता हे आंदोलन अजून चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे.
बच्चू कडूंच्या आंदोलनाचा सहावा दिवस
शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, दिव्यांग, विधवा महिलांना 6 हजार रुपये मानधन, वंचित घटकांचे प्रश्न या मागण्यांसाठी बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. बच्चू कडूंच्या या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाला आता राज्यातूनही अनेक नेते मंडळी आणि संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. सरकार दरबारी सुद्धा हे आंदोलन मागे घेण्यासंदर्भात चर्चेचा मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
प्रकृती चिंताजनक
बच्चू कडू यांची प्रकृती पूर्णपणे खालावली त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पोटात अन्न नसल्याने बच्चू कडू यांच्या किडनी व शरीराच्या इतर भागावर परिणाम झाला आहे. वैद्यकीय पथकाकडून बच्चू कडू यांच्या शरीराची पूर्णपणे तपासणी करण्यात आली आहे. बच्चू कडू यांना डॉक्टरांकडून सलाईन घेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र बच्चू कडू यांचा सलाईन घेण्यास नकार दिला. कार्यकर्ते व शेतकर्यांकडून बच्चू कडू यांना सलाईन घेण्याची विनंती करण्यात आली, मात्र मागण्या पूर्ण होईस्तर आपण औषधोपचार घेणार नाही, असा पवित्रा कडू यांनी घेतला आहे. मंत्री भरत गोगावले, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री जयकुमार गोरे या मंत्र्यांसोबत मागण्या संदर्भात बच्चू कडू यांची ऑनलाइन बैठक झाली. मात्र या ऑनलाईन बैठकीमध्ये ठोस आश्वासन न मिळाल्याने बच्चू कडू उपोषणावर ठाम आहेत.
बावनकुळे घेणार कडूंची भेट
आज बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस आहे.आज सायंकाळी 5 वाजता महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देणार बच्चू कडू यांच्या आंदोलन स्थळी भेट देणार आहे. कडू आणि बावनकुळे यांच्यात यापूर्वी फोनवर बोलणी झाली. पण त्यावरून कडू नाराज झाले होते. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनावर आज तोडगा निघणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रहारच्या पदाधिकार्याने केलं विष प्राशन
बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाशी दखल न घेतल्याने प्रहारच्या पदाधिकाऱ्याने विष प्राशन केले. अजय भागवतराव चौधरी वय (35 वर्ष) रा. करजगाव ता. वरुड येथील हा कार्यकर्ता आहे. अजय चौधरी हे प्रहार वरुड तालुका संपर्क प्रमुख आहेत.त्यांच्यावर वरुड येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.