Yashomati Thakur : आ. यशोमती ठाकूर यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर दिली भेट
रोहणखेडा, नांदुरा, देवरा, सावंगा, अंतोरा, यावली शहीद या गावांमध्ये भेटी दिल्या. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.

अमरावती : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती (flood situation) ओढवली आहे. विदर्भाला (Vidarbha) या अतिवृष्टीचा मोठा तडाखा लागला आहे. नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामध्ये नैसर्गिक हानी मोठ्या प्रमाणात झाली. शेतकऱ्यांची शेती अक्षरश: भुईसपाट झाली आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानग्रस्त भागाची तात्काळ पंचनामे (Panchname) करून मदत द्यावी असे निर्देश माजी पालकमंत्री, आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. अमरावती झालेल्या अतिवृष्टी व ओलावलेल्या पूर परिस्थितीच्या पाहणी करण्याकरिता माजी मंत्री, माजी पालकमंत्री, आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या समितीसोबत अमरावती तालुक्यातील काही गावांचा पाहणी दौरा केला.
या भागात दिल्या भेटी
रोहणखेडा, नांदुरा, देवरा, सावंगा, अंतोरा, यावली शहीद या गावांमध्ये भेटी दिल्या. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी, असे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी किशोर गजभिये, शकुर नागाणी, बबलु देशमुख, सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, हरिश मोरे, पंकज देशमुख, दिलीप सोनावणे, शैलेश काळबांडे तसेच गावातील सरपंच व ग्रामस्थ आदी मंडळी उपस्थित होती.
काँग्रेसची अतिवृष्टी पाहणी समिती जिल्ह्यात दाखल
अतिवृष्टीने जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करून त्याचा अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सादर करण्याच्या उद्देशाने सोमवारी काँग्रेसची अतिवृष्टी पाहणी समिती माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावतीत दाखल झाली. त्यांनी पहिल्या दिवशी नुकसानग्रस्त अमरावती तालुक्यातील रोहनखेडा, देवरा, सावंगा, या गावांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात समितीच्या सदस्यांसह जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची देखील उपस्थिती होती. अतिवृष्टीमुळे राज्यात हाहाकार माजला. मोठ्या प्रमाणात गावांचा संपर्क तुटलेला आहे. अनेक ठिकाणी माणसे मृत्यूमुखी पडली. कित्येक जनावरे दगावली आहेत. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे व फळ बागायतींचे फार मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील या सर्व नुकसानाचा आढावा घेऊन याचा विस्तृत अहवाल काँग्रेस कमिटी एकत्र करणार आहे. या नुकसानग्रस्तांना मदत मिळण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहे. याकरिता सर्व जिल्ह्यात जिल्हास्तरीय समितीचे गठन करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचे गठन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त समितीमध्ये किशोर गजभिये, आ. बळवंत वानखडे, शकूर नागाणी, प्रकाश तायडे, धनंजय देशमुख यांचा समावेश आहे. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशनुसार या संपूर्ण नुकसानाची पाहणी केली जात आहे.
