‘शरद पवार, तुम्हाला माफी मागायची असेल तर…’, देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या सभेत बरसले

"मोदींच्या नेतृत्वात आज या ठिकाणी टेक्सटाईल पार्क आलं. मोदींच्या नेतृत्वात रेल्वे स्टेशन सौंदर्यकरण आलं. मोदींच्या नेतृत्वात या ठिकाणी अनेक गोष्टी आल्या. त्यामुळे तुम्ही माफी मागितलीच पाहिजे, पण जनेतेची मागितली पाहिजे. इतके वर्ष राजकारण केलं, पण विदर्भाला काही दिलं नाही", अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

शरद पवार, तुम्हाला माफी मागायची असेल तर..., देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या सभेत बरसले
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा फाईल फोटो
| Updated on: Apr 24, 2024 | 5:35 PM

महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज अमरावतीत सभा आयोजित करण्यात आली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी “मी अमरावतीचा भाचा आहे. माझी आई, माझे मामा अमरावतीचे आहेत. त्यामुळे माझ्याकरता ही भूमी महत्त्वाची आहे. त्यामुळे जेवढं प्रेम नागपूरवर आहे, तेवढंच प्रेम अमरावतीवर आहे”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“अमरावतीत आम्ही खासदार नवनीत राणा यांना निवडून आणण्याकरता सर्वजण इथे आलो आहोत. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, ज्यांनी या देशामध्ये कलम 370 रद्द केलं, ते देशाचे कणखर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले आहेत. त्यांचं जोरदार स्वागत करुयात. मी निश्चितपणे हे म्हणू शकतो की, आजपर्यंतच्या अमरावतीच्या इतिहासात सगळ्यात मोठी सभा ही आज होतेय. तुमची उपस्थिती ही निश्चितपणे सांगते आहे की, नवनीत राणा या प्रचंड मताने निवडून येणार आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘राहुल गांधींची 26 पक्षांची खिचडी’

“ही निवडणूक साधी निवडणूक नाही. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. हा देश कुणाच्या हाती द्यायचा, याचा फैसला करायची निवडणूक आहे. एकीकडे विश्वगौरव नरेंद्र मोदी आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत. फैसला तुम्हाला करायचा आहे. मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, रामदास आठवले यांची रिपाईं आहे, कवाडे साहेबांचा पक्ष आहे, जानकरांची रासप आहे, राज ठाकरेंची मनसे आहे, वेगवेगळे पक्ष सोबत येऊन आपली महायुती आहे. त्या ठिकाणी राहुल गांधींची 26 पक्षांची खिचडी आहे”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

‘ज्यांची एकही व्यक्ती निवडून येऊ शकत नाहीत ते…’

“राहुल गांधींना त्यांच्या खिचडीचे लोकं देखील नेता मानायला तयार नाहीत. परवा कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री म्हणाले, राहुल गांधी हे अपरिपक्व आहेत. ते देशाचं नेतृत्व करु शकत नाहीत. त्यांच्या आघाडीची अवस्था अशी आहे की, राहुल गांधी यांना नेता मानायला शरद पवार आणि उद्धव ठाकरे ऐकणार नाहीत. आता तर एकाने घोषित करुन टाकलं की, देशाचे पंतप्रधान उद्धव ठाकरे होणार आहेत. आता मला सांगा, ज्यांची एकही व्यक्ती निवडून येऊ शकत नाहीत ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का? ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत कुणी जाईल का? कुणीच जाणार नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

‘शरद पवार, तुम्हाला माफी मागायची असेल तर…’

“परवा शरद पवार आले होते. शरद पवार म्हणाले, मागच्या वेळेस नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता याबद्दल माफी मागतो. तुम्हाला माफी मागायची असेल तर विदर्भाची मागा, कारण तुम्ही सातत्याने विदर्भावर, अमरावतीवर अन्याय केला. तुम्ही सातत्याने आम्हाला मागास ठेवलं. मोदींच्या नेतृत्वात आज या ठिकाणी टेक्सटाईल पार्क आलं. मोदींच्या नेतृत्वात रेल्वे स्टेशन सौंदर्यकरण आलं. मोदींच्या नेतृत्वात या ठिकाणी अनेक गोष्टी आल्या. त्यामुळे तुम्ही माफी मागितलीच पाहिजे, पण जनेतेची मागितली पाहिजे. इतके वर्ष राजकारण केलं, पण विदर्भाला काही दिलं नाही”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.