बच्चू कडूंचा गांधीगिरी नंतर आक्रमक पवित्रा; आज अमरावतीत कोण मैदान गाजवणार

| Updated on: Apr 24, 2024 | 9:13 AM

Lok Sabha Election 2024 : अमरावतीत आज रखरखत्या उन्हापेक्षा बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यातील वादाने वातावरण तापणार आहे. शहरातील मध्यवर्ती सायन्सकोर मैदानावरुन सध्या दोघांमध्ये जुंपली आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची या मैदानावर सभा होत आहे. तर बच्चू कडू पण मागे हटायला तयार नाहीत.

बच्चू कडूंचा गांधीगिरी नंतर आक्रमक पवित्रा; आज अमरावतीत कोण मैदान गाजवणार
अमरावतीत कोण मैदाना मारणार
Follow us on

Navaneet Rana-Bachhu Kadu : आज रखरखत्या उन्हापेक्षा राजकीय वातावरणाचे चटके प्रशासन आणि पोलिसांना सहन करावे लागणार आहे. काल त्याचा ट्रेलर उभ्या महाराष्ट्राने पाहिला. शहरातील सायन्सकोर मैदानावरुन वातावरण तापले आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा या मैदानावर होत आहे. भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी ते अकोल्यानंतर अमरावतीत येत आहेत. पण या मैदानावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रचारसभेला अगोदरच प्रशासनाने परवानगी दिली आणि नंतर ती रद्द केल्याचा दावा करत बच्चू कडू यांनी प्रशासन आणि पोलिसांना जाब विचारला. त्यामुळे आज उभ्या महाराष्ट्राचं अमरावतीकडे लक्ष लागले आहे.

थोड्याच वेळात जाहीर करणार भूमिका

बच्चू कडू यांनी आज सकाळी 10 वाजता कार्यकर्त्यांना जिल्हा स्टेडियमवर हजर राहण्याचे आवाहन केले आहे. या ठिकाणाहून दुपारी ते आंदोलन करणार आहेत. जिल्हा स्टेडियमवरुन बच्चू कडू भूमिका ठरवतील. सभेला परवानगी न दिल्यास दीड लाख कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाण मांडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. काही समाजकंटक प्रशासनाच्या या चुकीचा आणि आमच्या आंदोलनाचा फायदा घेणार असल्याचे कळाल्याने आम्ही दोन पावलं मागे घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर अमरावतीत दाखल होतील असे त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

प्रहारचा दावा काय

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिनेश बूब हे लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी अमरावतीमधील मुख्य भागातील सायन्स कोर मैदान आरक्षित करण्यात आले होते. 23 आणि 24 एप्रिलसाठी प्रहारने हे मैदान सभेसाठी आरक्षित केले होते. त्यासाठी रीतसर पैसे भरुन पावती घेतल्याचा दावा प्रहारने केला आहे. पण त्याच ठिकाणी नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठीची जय्यत तयारी पण झाली. त्यामुळे बच्चू कडू यांनी काल संताप व्यक्त केला. पोलिसांनी मैदानाच्या पाहणीसाठी आलेल्या कडूंचे वाहन आडवल्यानंतर मोठा राडा झाला. बच्चू कडू यांनी अगोदर पोलिसांना दंडवत घातला आणि नंतर त्यांना चांगलाच जाब विचारला. पोलीस हे भाजपच्या कार्यकर्त्यासारखे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला.