Navneet Rana : सर्वांची माफी माग, नाही तर तुला…; पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घालणाऱ्या नवनीत राणांना पोलीस पत्नीचा इशारा

पोलिसांबद्दल अपशब्द तू नेहमीच वापरतेस. आता मात्र त्यांची माफी मागावी लागेल, अन्यथा तुला सोडणार नाही, असा इशारा पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी नवनीत राणांना दिला आहे.

Navneet Rana : सर्वांची माफी माग, नाही तर तुला...; पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घालणाऱ्या नवनीत राणांना पोलीस पत्नीचा इशारा
नवनीत राणा/वर्षा भोयर
Image Credit source: tv9
| Updated on: Sep 10, 2022 | 10:33 AM

अमरावती : सर्वांची माफी माग, नाहीतर तुला सोडणार नाही, असा इशारा पोलिसाच्या पत्नीने खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना दिला आहे. लव्ह जिहाद झाल्याचा आरोप करत राणा यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता. शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात हा गोंधळ घालण्यात आला होता. कॅमेऱ्यासमोर नवनीत राणा यांनी प्रसिद्धीसाठी ही स्टंटबाजी केल्याचे बोलले जात आहे. मात्र यामुळे पोलीस कुटुंब (Police family) मात्र आता संतप्त झाले आहे. खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालत जोरदार बाचाबाची करून राडा घातल्यानंतर पोलीसही आक्रमक झाले आहेत. विशेषत: पोलिसांच्या कुटुंबीयांनी या सर्व प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना पदाधिकारी आणि पोलीस पत्नी वर्षा भोयर यांचा एक बाइट सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत आहे. यात त्यांनी नवनीत राणा यांना सणसणीत इशारा देत माफी मागण्याचे आवाहन केले आहे.

‘पोलिसांची जाहीरपणे माफी माग’

नवनीत राणा तुला शेवटची संधी देते. तुला खरेच माणुसकी असेल ना, तर सर्व पोलिसांची जाहीरपणे माफी माग. नाहीतर तुला आता मी सोडणार नाही. तू पोलिसांच्या काळजाला हात घातलेला आहेस. रात्रभर कोरोना काळामध्ये पोलिसांनी कर्तव्य पार पाडले. तुला पोलिसांचे दुःख नाही कळणार. पोलिसांबद्दल अपशब्द तू नेहमीच वापरतेस. आता मात्र त्यांची माफी मागावी लागेल, अन्यथा तुला सोडणार नाही, असा इशारा पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी दिला आहे.

राणांची स्टंटबाजी आली समोर

खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीत लव्ह जिहाद झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गोंधळही घातला होता. आपले कॉल रेकॉर्ड होत असल्याचे म्हणत राडा घातला होता. दरम्यान, या प्रकरणातील तरुणी आता सापडली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांची स्टंटबाजी समोर आली आहे. अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्या काळामध्ये अमरावती शहर सुरक्षित नाही. अमरावती शहरात लव जिहादची प्रकरणे वाढत चालली आहेत. काल आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोललो. गणपतीनंतर लवकरच अमरावतीला नवीन पोलीस आयुक्त येईल, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.