संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधिशांसोबत कोणी साजरी केली होळी, अंजली दमानिया यांचा फोटो ट्विट करत खळबळजनक दावा

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील व याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे धुरवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधिशांसोबत कोणी साजरी केली होळी, अंजली दमानिया यांचा फोटो ट्विट करत खळबळजनक दावा
अंजली दमानिया यांनी ट्विट केलेला फोटो.
| Updated on: Mar 14, 2025 | 4:58 PM

Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना अटक झाली आहे. दोषी पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहेत. न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. आता या प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी काही फोटो ट्विट करत सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांसोबत सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी होळी साजरी केल्याचे म्हटले आहे. या फोटो आणि व्हिडिओची ‘टीव्ही 9 मराठी’ पुष्टी करत नाही.

अंजली दमानिया यांचा दावा काय?

अंजली दमानिया यांनी म्हटले की, केजला होळीचा कार्यक्रम असताना तिथे राजेश पाटील जे एक निलंबित अधिकारी आहेत आणि दुसरे प्रशांत महाजन हे दोन्ही अधिकारी आले आहेत. ते सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांसोबत होळी खेळताना दिसतात. हे बघितल्यावर मला अतिशय धक्का बसला. न्यायाधिशांनी एखाद्या अधिकाऱ्यांबरोबर होळी खेळावी, ही अपेक्षा नाही. कारण न्यायालयाची काही एक प्रतिष्ठा असते. एक मॉडेल कोड ऑफ कंडक्टर प्रमाणे हे अपेक्षित आहे.

अंजली दमानिया यांनी पुढे म्हटले की, न्यायाधीशांकडे न्यायिक कार्यालयाची प्रतिष्ठा राखणे, निष्पक्षता राखणे आणि न्यायिक जीवनाच्या मूल्यांची पुनर्रचना इतर संबंधित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केल्याप्रमाणे निष्पक्ष कारवाई सुनिश्चित करणे हे अपेक्षित आहे. न्यायाधीशांनी न्यायालयात आणि बाहेर नैतिक वर्तनाचा सर्वोच्च मानांक राखला पाहिजे, अशी अपेक्षा आहे.

तिरंगा रेस्टॉरंटमध्ये संतोष देशमुख यांना मारण्याचा कट जेव्हा रचला गेला तेव्ह हजर असलेले प्रशांत महाजन म्हणा किंवा राजेश पाटील हे ज्या व्हिडिओमध्ये असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये 29 नोव्हेंबरला जी बैठक झाली त्या बैठकीत सगळेच्या सगळे गटातील लोक तिथे उपस्थित होते. यामुळे माझी अशी मागणी आहे की. यापुढे या खटल्याची सुनावणी त्या न्यायाधीशांकडून ‘इन ऑल फेअरनेस फोर लोक’ म्हणून काढून घ्यावी, अशी मागणी मी कायदा विभाग आणि मुख्य न्यायाधीशांकडे पत्र पाठवून करणार आहे, असे दामानिया यांनी म्हटले.

काय केले ट्विट…

अंजली दमानिया यांनी फोटो आणि व्हिडिओ ट्विट करत म्हटले की, हे फोटो तपासा आणि आधी खात्री करा. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील व याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे धुरवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत. संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या सोबत रंगाची उधळण करताना दिसत आहेत. आरोपीला वाचणारे हे निलंबित आधिकारी यांच्या सोबत खटला सुरु असताना न्यायाधीश होळी खेळत असतील तर हे खूप चुकीचे आहे, असे दामानिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.