
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे, याचसोबत राज्यात आणखीही काही घडामोडी घडताना दिसत आहेत, या सर्वांवर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठं भाकीत देखील केलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या दमानिया?
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बऱ्याच मोठ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडणार असल्याचं बोललं जात आहे, त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील स्पष्टपणे दिसणार आहेत. एकंदरीतच आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांचा सप्टेंबरपर्यंत भाव वाढणार आहे, असं चित्र सध्या तरी दिसतंय, असा गौप्यस्फोट अंजली दमानिया यांनी केलं आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, केंद्रात सध्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. एनडीएचे जे घटक पक्ष आहे ते त्यांना सपोर्ट करत नसल्याची सुद्धा चर्चा आहे, त्यामुळे राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसोबत समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली असावी, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये प्रथमच ठाकरे बंधुंची युती पहायला मिळाली, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी एकत्र ही निवडणूक लढवली, मात्र या निवडणुकीमध्ये त्यांना खातंही उघडला आलं नाही, त्यानंतर आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, या भेटीवर प्रतिक्रिया देताना दमानिया यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टेला लगवला आहे.
बेस्ट निवडणुकीचे निकाल लागले त्यात ठाकरे बंधूंना शुन्य जागा मिळाल्या, त्यामुळे ते मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी गेले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत भविष्य दिसत नसल्यानं राज ठाकरे हे भाजपसोबत जाण्याचा विचार करत असावेत, स्वत:चा भाव भाजपसोबत वाढवण्यासाठी त्यांनी काही विधाने केली, पण त्यांना उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची कोणतीच इच्छा नसावी, ते एक दिवस उद्धव ठाकरे यांना तोंडघशी पाडतील असं दमानिया यांनी म्हटलं आहे.