वैष्णवी हगवणे प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप, नातवाला आणण्यासाठी गेले असता पिस्तुल दाखवून धमकावलं
मोठी बातमी समोर येत आहे, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आता आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे, पिस्तूल दाखवून धमकी दिल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. माझी मुलगी वैष्णवी आणि शशांक हगवणे यांच्यामध्ये प्रेमसबंध असल्याची माहिती मला मिळाली होती, त्यानंतर मी त्यांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला, मी लग्नात हुंडा म्हणून हगवणे कुटुंबाला 51 तोळे सोनं, फॉरच्यूनर गाडी आणि चांदीची भांडी दिली, मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून हगवणे कुटुंबाने माझ्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली असं अनिल कस्पटे यांनी एफआयआर म्हटलं आहे.
दरम्यान माझी मुलगी जेव्हा गर्भवती होती, तेव्हा तीने ही आनंदाची गोष्ट तिच्या पतीला सांगितली तेव्हा त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला, हे मुलं आपलं नसल्याचं त्याने म्हटलं. त्यानंतर वैष्णवीला माझ्या घरी त्यांनी आणून सोडलं. वैष्णवीला हा जाच असाह्य झाल्यानं तिने यापूर्वी देखील जेवणातून विष खावून आत्महत्येचा प्रयत्न केला होता असा आरोपही तिच्या वडिलांनी यावेळी केला आहे. आमच्या वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
वैष्णवीच्या आई- वडिलांनी तिच्या नऊ महिन्यांच्या नातवाबाबत चिंता व्यक्त केली आहे. नातवाला आणण्यासाठी बाळाचे आजोबा (वैष्णवीचे चुलते) गेल्यानंतर निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीं पिस्तुल दाखवून त्यांना धमकवल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. “आमचा नातू आम्हाला परत आणून द्यावा” अशी विनंती पोलिसांना आजोबा अनिल कस्पटे यांनी केली आहे. पोलीस कोठडीत आरोपींना ‘व्हीआयपी’ ट्रीटमेंट मिळत असून त्यांना हॉटेलचं जेवण मिळत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
प्रकरणानं खळबळ
दरम्यान या प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली आहे, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात महिला आयोगानं सुमोटो दाखल केला आहे. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो ती विकृती असते त्याला शिक्षा मिळणार, राज्य महिला आयोग त्याचा पाठपुरावा करणार असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.