दिल्लीत केजरीवाल यांच्या पराभवासाठी जबाबदार कोण? ‘सामना’तून मोठा खुलासा, म्हणाले “स्वत: केजरीवाल…”
दिल्ली विधानसभेच्या 70 जागा आम्ही एकटे लढणार. त्यानंतर ‘आप’चा प्रत्येक नेता हेच बोलत राहिला. तुम्ही काँग्रेसला दोष का देता? असा सवाल सामनातून करण्यात आला.

राजधानी नवी दिल्लीत आम आदमी पार्टीचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर नुकतंच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी दिल्लीत आपचा पराभव नेमका कोणत्या कारणांनी झाला, याबद्दलची माहिती घेण्यात आली. आता यावरुन सामनातून सविस्तर भाष्य करण्यात आले आहे. काँग्रेसला भाजपला हरवायचे नव्हते. त्यांना मोदीविरोधक केजरीवालना हरवायचे होते, असा घणाघात सामनातून करण्यात आला.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या विशेष सदर रोखठोकमधून आज दिल्लीतील निवडणूक निकालाचा आढावा घेण्यात आला. यावेळी दिल्लीचा पराभव हा काँग्रेससह आपमुळेही झाला, असा अप्रत्यक्षरित्या दावा करण्यात आला. दिल्लीत आम आदमी पार्टीचा पराभव म्हणजे एका स्वप्नाचे मरण आहे. आदर्शवाद, नैतिकता, भ्रष्टाचारमुक्त शासन हे स्वप्न घेऊन केजरीवाल व त्यांचे लोक आधी रस्त्यावर आणि मग राजकारणात उतरले. त्यांचे स्वप्नही शेवटी भ्रष्टाचाराच्या आरोपात गढूळ झाले व आता भाजपने त्या स्वप्नाचा पराभव केला. यास जबाबदार कोण? असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
“…त्याच दिल्लीने केजरीवाल यांना फेकून दिले”
“दिल्लीत आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला तेव्हा एका मोठ्या वर्गाचे स्वप्न मरण पावले. स्वच्छ, प्रामाणिक राजकारणाचे स्वप्न घेऊन केजरीवाल आणि त्यांचे लोक अवतरले. देशाच्या राजधानीत त्यांनी तब्बल दहा वर्षे राज्य केले. जनतेने त्यांना प्रचंड समर्थन दिले व आता भ्रष्टाचार, अनागोंदी, फसवणूक अशा आरोपांच्याच घेऱ्यात गुंतून तेच केजरीवाल पराभूत झाले. त्याच दिल्लीकर जनतेने त्यांना पराभूत केले. सगळ्यांच्या स्वप्नांच्या जणू ठिकऱ्याच उडाल्या. केजरीवाल यांनी देशाला दाखवलेल्या स्वप्नांचा असा मृत्यू होणे देशाला परवडणारे नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलनाचा ते चेहरा बनले. ‘आदर्श’, `साधनशूचिता’ या शब्दांना राजकारणात पुनर्जिवित करणाऱ्या केजरीवाल आणि कंपनीचा दिल्लीत झालेला दारुण पराभव हा केजरीवालांना तर धक्का आहेच, पण देशाने पाहिलेले आदर्शवादाचे स्वप्नदेखील चक्काचूर झाल्यासारखे आहे. ज्या दिल्लीने केजरीवाल आणि कंपनीला डोक्यावर घेतले त्याच दिल्लीने केजरीवाल यांना फेकून दिले. यास काय म्हणावे? असा सवालही करण्यात आला आहे.
लोकसभेत मोदी यांच्या मनमानी कारभारास आव्हान देणाऱ्या इंडिया आघाडीवर त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ही पडझड भाजपच्या फायद्याची आहे व त्याचे परिणाम भविष्यात देशाला भोगावे लागतील. हरयाणा आणि दिल्लीत ‘आप’शी समझोता झाला नाही याचे खापर काँग्रेसवर फोडले जाते ते तितकेसे बरोबर नाही. अजय माकन सांगतात, “हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेसने पुढाकार घेऊन ‘आप’शी एकत्र निवडणुका लढण्यासंदर्भात चर्चा सुरू केली. आम्ही त्यांना चार जागा देत होतो. त्यांनी सहा जागा मागितल्या. प्रश्न चार किंवा सहा जागांचा नव्हता. तो विषय चर्चेतून सुटलाच असता, पण इतक्यात केजरीवाल हे जामिनावर सुटले. ते तुरुंगाच्या बाहेर पडले व दुसऱ्याच दिवशी त्यांनी घोषणा केली की, हरयाणातल्या सर्व 90 जागा आम्ही लढवणार आहोत. तर ही सुरुवात राहुल गांधींनी नाही केली. हरयाणा निवडणुकीपासून ही सुरुवात केजरीवाल यांनी केली. हे योग्य नव्हते. लोकसभेत आम्ही एकत्र होतो, पण लोकसभा निवडणुका संपताच गोपाल राय यांनी सगळ्यात आधी घोषणा केली की, आता आमची काँग्रेसबरोबरची आघाडी तुटली आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागा आम्ही एकटे लढणार. त्यानंतर ‘आप’चा प्रत्येक नेता हेच बोलत राहिला. तुम्ही काँग्रेसला दोष का देता?” असा सवाल सामनातून करण्यात आला.
केजरीवाल यांची व्यथा चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती
“काँग्रेसची चर्चेची तयारी होती. हरयाणातही आणि दिल्लीतही.” अजय माकन सांगतात ते सत्य असेल तर काँग्रेसला संपूर्ण दोषी ठरविण्यात अर्थ नाही, पण महाराष्ट्रातील जागा वाटपात काँग्रेसने शेवटच्या मिनिटापर्यंत घातलेला घोळ अनाकलनीय होता हेसुद्धा तितकेच खरे. पण दिल्ली आणि हरयाणासंदर्भात स्वत: अरविंद केजरीवाल यांनी जी माहिती दिली, ती काँग्रेसच्या आघाडीबाबत धोरणांना एक्सपोज करणारी आहे. श्री. आदित्य ठाकरे यांच्यासोबत फिरोजशहा रोडवरील निवासस्थानी केजरीवाल यांची भेट झाली.
“काँग्रेसबरोबर युती झाली असती तर बरे झाले असते. केजरीवाल यांनी युती होऊ दिली नाही असा आक्षेप आहे.” “नाही. मी पूर्णपणे काँग्रेसबरोबर एकत्र निवडणुका लढण्याच्या बाजूने होतो,” केजरीवाल. “मग काय घडले?” “मी तुरुंगात असताना हरयाणाच्या निवडणुका झाल्या. राघव चड्डा हरयाणाचे काम पाहत होते. ते मला तुरुंगात भेटायला आले. मी त्यांना सांगितले, आपल्याला काँग्रेसबरोबर आघाडी करायलाच हवी. जागा वाटपाचे तुम्ही ठरवा,” केजरीवाल. “मग गाडं अडलं कुठे?” “काँग्रेसने आमच्याकडे यादी मागितली. आम्ही 14 मतदारसंघांची यादी दिली. राहुल गांधी म्हणाले, आम्ही ‘आप’ला सहा जागा देऊ. मी राघवला म्हणालो, हरकत नाही सहा जागा घ्या. आम्ही दोन पावले मागे आलो. गांधी म्हणाले, के.सी. वेणुगोपालना भेटा. ते फायनल करतील. राघव के.सी. वेणुगोपालांना भेटले. ते म्हणाले, सहा जागा शक्य नाही. आम्ही चार जागा देऊ. तुम्ही आमचे हरयाणाचे प्रभारी बावरियांना भेटा. चड्डा मला तुरुंगात भेटायला आले. मी म्हणालो, ठीक आहे. चार जागा घ्या. चड्डा बावरियांना भेटायला गेले तर त्यांनी चारचा प्रस्तावच उडवून लावला. म्हणाले, आम्ही तुम्हाला दोन जागाच देऊ. मी पुन्हा चड्डांना निरोप दिला. ठीक आहे. दोन जागा घ्या. राहुल गांधी हे बॉस असताना व त्यांनी शब्द देऊनही आम्हाला सहा जागा मिळाल्या नाहीत. चारवरून दोनवर आलो. त्या दोन जागांसाठी चड्डा हे शेवटी भूपेंद्र हुड्डांना भेटले. तेव्हा त्यांनी भाजपचे गड असलेल्या भागातील दोन जागा आम्हाला देऊ केल्या. ही काँग्रेसची ‘युती’ धर्माची व्याख्या. आम्ही काय करणार? हे झाले हरयाणाचे. दिल्लीतही वेगळे घडले नाही. त्यांना भाजपला हरवायचे नव्हते. त्यांना मोदीविरोधक केजरीवालना हरवायचे होते. हे सर्व सांगताना केजरीवाल यांची व्यथा चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. महाराष्ट्रानेदेखील हा अनुभव घेतला आहे”, असा संपूर्ण घटनाक्रम सामनातून सांगण्यात आला.
“जितकी काँग्रेस जबाबदार तितकेच स्वत: केजरीवालही”
“केजरीवाल, ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्र मार्गाचा पुनरुच्चार केला. इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा संवाद संपला आहे व काँग्रेसचे नेतृत्व नव्याने संवाद साधण्याच्या मन:स्थितीत नाही. महाराष्ट्र हा ईव्हीएमपेक्षा अहंकार आणि ‘फक्त आम्हीच’ या वृत्तीने गमावला. आता दिल्लीतही तेच घडले. केजरीवाल यांच्या पराभवास जितकी काँग्रेस जबाबदार तितकेच स्वत: केजरीवालही जबाबदार आहेत”, असाही थेट आरोप सामना रोखठोकमधून करण्यात आला.