
भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण सध्या सर्वत्र गाजत असून त्याच्याशी असलेली जवळीक रुपाली चाकणकरांना भोवली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर अखेर काल रुपाली चाकणकरांना राष्ट्रवादी काँग्रेसचं महिला प्रदेशाध्यक्षपदही सोडावं लागलं. काल रात्री त्यांनी राजीनामा दिला. याप्रकरणाची मोठी चर्चा राज्यात होत असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. फक्त चाकणकर नव्हे, इतरही अनेक मंत्री, आमदार खरातकडे जायचे, त्यांची नावं फडणवीसांनी जाहीर करावीत अशी मागणी राऊतांनी केली.
खरात बाबा दिल्लीता जाऊन कोणाला भेटत होते ?
ज्या प्रकरणात रुपाली चाकणकरांचं नाव आलं ते अत्यंत गंभीर आहे, लाजिरवाणं आहे, राज्याला कलंकित करणारं आहे. पण एकट्या चाकणकरचं आहेत का, तर तसं नाही. त्यामध्ये राज्यातले, देशातले अनेक महत्वाचे नेते आहेत. स्वत: दीपक केसरकर म्हणतात, मीच का ? 40 आमदार तिथे जात होते. सत्ताधारी पक्षाचे नेते सांगत आहेत, मलाच टार्गेट करू नका. तिथे 40 आमदार, खरात बाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते, आता हे 40 आमदार कोण?, तिथे जाणारे मंत्री कोण?, हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे. खरात बाबासाठी विशेष विमानांची सोय करणारे सरकारमधले कोण लोकं होते?, हे त्यांनी सांगितलं पाहिजे, खरात बाबा दिल्लीत जाऊन काय करत होते?, कोणाला भेटत होते?, हे सुद्धा पोलीस तपासात निष्पन्न झालं असेल, तर ते समोर यायला पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली.
खरातचा वावर कुठे नव्हता ? सर्वत्र होता, बहुतेक तो पंचमहाभूतापैकी एक असावा, असा त्याचा वावर होता, जणू काही सरकारने त्याला राजमान्यताच दिली होती असा टोला राऊतांनी हाणला. ती राजमान्यता देणारे लोकं आजही फडणवीसांच्या मंत्रीमंडळामध्ये आहेत, फडणवीसांनी त्यावर बोलावं असंही राऊत म्हणाले.
विरोधी पक्षाबाबतीत असं काही घडलं असतं तर आधी फाशी मग चौकशी..
नरहरी झिरवळांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावरही राऊतांनी टिप्पणी केली. झिरवळांना तूर्त अभय मिळाल्याचं दिसत आहे, त्या व्हिडीओची सत्यता पडताळली पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले, पत्रकारांच्या या प्रश्नावर राऊतांनी चोख प्रत्युत्तर दिलं. व्हिडीओची सत्यता कशी पडताळणार ? ते किरीट सोमय्यांच्या व्हिडीओची देखील सत्यता पडताळणार होते. अशा प्रकारचे व्हिडीओ आले की त्यांची सत्यता कधीच पडताळली जात नाही. एक ठराविक उत्तर दिलं जातं. विरोधी पक्षाच्या बाबतीत अशा काही घटना घडल्या असत्या तर आधी फाशी मग चौकशी, असं झालं असतं. इथे फाशीचं नावंच नाही, करू चौकशी, करू चौकशी, असा टोमणा राऊतांनी मारला.