जावई नाही आला तरी चालेल, पण मुलगी..; अशोक खरातचे कारनामे समजल्यावर सासूची एकच इच्छा

भोंदू बाबा अशोक खरातप्रकरणी आता त्याच्या सासूची प्रतिक्रिया समोर आली आहे. कल्पना खरातची आई पार्वतीबाई यांना अश्रू अनावर झाले. मला कोणी काही सांगत नाही, आमच्या खानदानात असं काही घडलं नाही, असं त्या म्हणाल्या.

जावई नाही आला तरी चालेल, पण मुलगी..; अशोक खरातचे कारनामे समजल्यावर सासूची एकच इच्छा
अशोक खरात
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 14, 2026 | 10:38 AM

भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणी आता ईडीकडून चौकशी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयाने खरातची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. विशेष तपास पथक आता चौथ्या गुन्हात अटक करून आज (मंगळवार) पुन्हा त्याला न्यायालयात हजर करणार आहे. याप्रकरणी आता अशोक खरातची सासू आणि कल्पना खरातची आई पार्वतीबाई यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘टीव्ही 9’मराठीशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. जावई परत आला नाही तरी चालेल, पण मुलगी आली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काय म्हणाल्या सासू?

“मला काहीच कोणी सांगत नाही आणि मी विचारतही नाही. मला खूप वाटतं, का म्हणून त्यांना कोंडलं? माझ्या खानदानात कधी असं झालं नाही. ही घटना का आणि कशी घडली मला माहित नाही आणि ज्यांना माहीत आहे ते काही सांगतात का?रडावं का गुपचूप बसावं? माझी मुलगी तर एकदम साधी, ती कधी कोणाला काही बोलली नाही, काही केलं नाही. पण तिच्या काय कर्माला आलं? कधी सुटते काय माहित? ती कुठे आहे काहीच माहीत नाही. वाटतं लवकर यावं पण येतील का? जावई नाही आले तरी चालेल पण माझी मुलगी आली पाहिजे,” असं त्या म्हणाल्या.

याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “इथे फक्त मुलगा, मुलगी आणि पाहुणे आहेत. आता हे कधी संपेल काय माहीत? आमची मुलगी फक्त घरी आली पाहिजे. घरात सर्वजण भेदरलेले आहेत. मी तरी कशीबशी बाहेर येते पण बाकी कोणी येत नाही.” दरम्यान खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने मालमत्ताशी संबंधित दस्तावेज, बँक खात्यांचे तपशील ईडीकडे सोपविली होती. त्याआधारे आता ईडीने खरातच्या मालमत्तेची छाननी सुरू केली आहे.

महिला लैंगिक शोषणप्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या खरातविरोधात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत 13 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यातील नऊ गुन्ह्यांचा तपास एसआयटी तर उर्वरित गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. लैंगिक शोषणप्रकरणी दाखल प्रत्येक गुन्ह्याचा तपास मुदतीत, पुरावे गोळा करून करण्याचा एसआयटी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं या पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केलं होतं.

Follow Us