इम्तियाज जलील म्हणाले, बाप्पा संपूर्ण जगावरील कोरोनाचे विघ्न दूर करो… तर माजी खासदार खैरे म्हणाले, कोरोना पाकिस्तानात जावो…

एमआयएमच्या खासदारांनी सर्वधर्म समभावाचा नारा देत, गणेशजी भारतावरील नव्हे तर संपूर्ण जगावरील कोरोनाचे विघ्न दूर करोत, असे वक्तव्य केले. हिंदू धर्माचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या माजी खासदार खैरे यांनी कोरोना पाकिस्तानात जावो, असे वक्तव्य केले.

इम्तियाज जलील म्हणाले, बाप्पा संपूर्ण जगावरील कोरोनाचे विघ्न दूर करो... तर माजी खासदार खैरे म्हणाले, कोरोना पाकिस्तानात जावो...
गणेशोत्सवासंबंधी बैठकीत एमआयएम व शिवसेनेच्या वक्तव्याची चर्चा शहरात आहे.

औरंगाबाद: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सुरक्षितता आणि नियोजनासाठी विविध ठिकाणी बैठका आयोजित केल्या जात आहेत. औरंगाबादमध्येही गणेश उत्सव शांतता समितीची बैठक गुरुवारी संध्याकाळी पार पडली. यावेळी कट्टरतेची झुल पांघरणाऱ्या एमआयएमच्या (MIM, Aurangabad) खासदारांनी सर्वधर्म समभावाचा नारा देत, गणेशजी भारतावरील नव्हे तर संपूर्ण जगावरील कोरोनाचे विघ्न दूर करोत, असे वक्तव्य केले. तर वसुधैव कुटुम्बकम् ची संस्कृती जोपासणाऱ्या आणि हिंदू धर्माचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या माजी खासदार चंद्रकांत खैरे (Ex MP Chandrakant Khaire) यांनी कोरोना पाकिस्तानात जावो, अशी पारंपरिक भूमिका घेतली. त्यामुळे एमआयएम पक्ष काळानुरूप आपली कट्टरता बाजूला सारत असल्याचे चित्र आहे. मात्र शिवसेना अजूनही पारंपरिक भूमिकांवर ठाम असल्याचे दिसून येते.

कोरोना पाकिस्तानाता जावो- खैरे

गणेश उत्सव शांतता समितीच्या बैठकीत बोलताना शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, आपल्या भारत देशातून कोरोना हद्दपार व्हावा. देशवासियांवरील संकट दूर व्हावे. तसेच हा कोरोना पाकिस्तानात जावा, अशीही भूमिका खैरे यांनी घेतली. मात्र एमआयएम पक्षाचे नेते व खासदार इम्तियाज जलील यांनी यापेक्षा वेगळी भूमिका मांडली.

बाप्पाने जगाचे संकट हरण करावे- जलील

शिवसेनेने हिंदू धर्मियांना खुश करणारी ही पारंपरिक भूमिका घेतली असतानाच, इम्तियाज जलील यांनी मात्र सर्वधर्मसमभावाची भूमिका घेतली. यावेळी व्यासपीठावर बोलताना त्यांनी गणपतीचा श्लोक म्हटला. तसेच गणेशजी तर सर्व दुःखांचे निवारण करणारी देवता आहे. त्यामुळे त्यांनी फक्त भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील कोरोनाचे संकट दूर करावे, अशी मी प्रार्थना करतो. कट्टरतेसाठी प्रसिद्ध असलेल्या एमआयएमच्या भूमिकेमुळे उपस्थितांना सुखद धक्का बसला.

जलील यांनी व्यक्त केली नाराजी

यावेळी भाषण करताना, इम्तियाज जलील यांनी एक खंत व्यक्त केली. नूतन कॉलनी येथे गणेश उत्सवाविषयीचे एक होर्डिंग लावले आहे. त्यात 60 जणांचे फोटो आहेत, पण माझा नाही. गेल्या सात वर्षांपासून उत्सव समितीत माझे नाव का नाही, असा प्रश्न त्यांची उपस्थित केला. मात्र मंडळ सदस्यांनी तत्काळ यंदाच्या पत्रकात जलील यांचे नाव असल्याचे दाखवल्यानंतर त्यांची ही नाराजी दूर झाली.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्यासह औरंगाबाद गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, नूतन अध्यक्ष अभिषेक देशमुख, नंदकुमार घोडेले, बापु घडामोडे, रशीदमामू आदी उपस्थित होते.

इतर बातम्या- 

राज ठाकरेंच्या पुणे प्लॅनला चेकमेट करण्यासाठी शिवसेना मैदानात, मनसेतून आलेल्या नेत्याला पुण्याची जबाबदारी

सिंधुदुर्गात राणेंना झटका, 2 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश; नितेश राणे म्हणतात ‘येड्यांची जत्रा’!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI