औरंगाबादः आगामी महापालिका निवडणुकांबाबत अद्याप अनिश्चितता असली तरीही मनसे मात्र स्थानिक पातळीवर कामाला लागली आहे. घराघरात मनसे असे ब्रीदवाक्य घेत औरंगाबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मोर्चेबांधणी करत आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसात औरंगाबाद मनसेमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता दिसून येत होती. पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जिल्ह्याच्या कार्यकारिणीत बदल केल्यानंतर पदाधिकाऱ्यांमधील मतभेद अधिक स्पष्ट दिसून येत होते. मात्र नव्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांमार्फतही पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणीचे काम वेगाने सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात मनसेच्या दोन नव्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले.