राज्यात दोन शिवजयंती नको, औरंगाबादच्या शिवसेना आमदारांची मागणी, आता लक्ष मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे!

| Updated on: Feb 14, 2022 | 5:19 PM

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका औरंगाबाद शिवसेनेने मांडली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात दोन शिवजयंती नको, औरंगाबादच्या शिवसेना आमदारांची मागणी, आता लक्ष मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे!
शिवसेना आमदार संजय शिरसाट आणि अंबादास दानवे यांची सरकारला विनंती
Follow us on

औरंगाबाद : राज्यात तिथी आणि तारखेनुसार अशा दोन प्रकारे शिवजयंती (Shivjayanti) साजरी केली जाते. विशेषतः शिवसेनेच्या वतीने शिवजयंती ही तिथीनुसारच साजरी केली जाते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच ही भूमिका घेतली होती. मात्र औरंगाबाद शिवसेनेने या प्रथेवरुन एक पाऊल मागे घेत वेगळी भूमिका मांडली आहे. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवजयंती तारखेनुसारच साजरी केली जावी, अशी भूमिका मांडली. तसेच एकच शिवजयंती साजरी केल्यास शिवसैनिकांना एकत्रितपणे उत्साह साजरा करता येईल, त्यामुळे राज्यातदेखील एकाच दिवशी शिवजयंती साजरी केली जावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती आमदारांनी टीव्ही9 च्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

आमदार संजय शिरसाट काय म्हणाले?

दरवेळेला शिवजयंती साजरी करताना गोंधळ होतो. सर्व संघटनांची मागणी होती की, एकच शिवजयंती साजरी केली असता अधिक जल्लोषाने उत्सव साजरा करता येईल. दोन दिवस वेगवेगळी शिवजयंती केल्यामुळे डिस्टर्बन्स येतो. त्यामुळे आता दोन शिवजयंती औरंगाबादेतच काय संपूर्ण राज्यात नको आहेत. ही आमची सर्वांची प्रामाणिक भूमिका आहे. ही विनंती आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहोत.

आमदार अंबादास दानवे काय म्हणाले?

शिवाजी महाराजांची जयंती वेगवेगळ्या दिवशी साजरी होते. आधीच्या काळात तिथीने व्हायची नंतरच्या काळात तारखेनीही उत्साहाने साजरी केली जाते. त्यामुळे या महापुरुषाची जयंती दोन वेळा का साजरी होते, असा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारकडे यंदाची शिवजयंती 19 तारखेला साजरी व्हावी, अशी मागणी करणार आहोत.

तारखेनुसार 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती

छत्रपती शिवजी माहाराज यांची तारखेनुसार 19 फेब्रुवारी रोजी जयंती साजरी केली जाते. ऐतिहासिक दस्तावेजानुसार, शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला आहे. महाराष्ट्र सरकारने 2000 साली विधीमंडळात तसा ठराव मांडून शिवजयंतीच्या कार्यक्रमांसाठी 19 फेब्रुवारी ही तारीख मंजूर करून घेतली. तर हिंदु दिनदर्शिकेनुसार, शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 या दिवशी झाला, असं मानलं जातं. तसेच काही संघटना शिवाजी महाराजांची 6 एप्रिल 1927 म्हणजे वैशाख वद्य द्वितीय शके 1549 असल्याचं मानतात.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान, शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका औरंगाबाद शिवसेनेने मांडली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या-

Schools| औरंगाबादेत आजपासून बालवाडी ते चौथीचे वर्गही सुरु, कोचिंग क्लासेसलाही परवानगी, कोरोनाची स्थिती काय?

जगप्रसिद्ध वेरूळ लेणींजवळील जैन कीर्तिस्तंभ हटवणार नाहीत, केंद्रीय मंत्र्यांची ग्वाही, काय आहे वाद?