डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांना 150 कोटी? महाराष्ट्रातील पुढाऱ्यांव…, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्यासाठी खासदारांना 150 कोटींचा 'भाव' लावला जात आहे. केंद्र सरकार काही राजकीय पक्षांना वळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील नेत्यांवर ही जबाबदारी सोपवली असून, दोन दिवसांपूर्वी 100 कोटी असलेला आकडा आता 150 कोटींवर पोहोचल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

केंद्र सरकार पुन्हा एकदा डीलिमिटेशन बिल आणणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारची जुळवाजुळव सुरू झाली आहे. काही राजकीय पक्षांना आपल्याकडे ओढण्याचा केंद्राचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही महाविकास आघाडीच्या सूरापेक्षा वेगळा सूर लावला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. खासदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी आणि डीलिमिटेशन बिलाला त्यांनी पाठिंबा देण्यासाठी 150 कोटींचा भाव लावला आहे. दोन दिवसांपूर्वी हा आकडा 100 कोटी होता, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. डीलिमिटेशन बिल मंजूर करण्यासाठी 150 कोटींचा भाव लावण्यात आला आहे. होलसेलमध्ये खासदारांना आपल्याकडे ओढलं जात आहे. म्हणून भाजप संसदेचं अधिवेशन घेत नाही. त्यांची खासदारांची जुळवाजुळव सुरू आहे. या विधेयकाला महाराष्ट्रातील खासदारांनी पाठिंबा दिला तर माझा आकडा लक्षात ठेवा. दोन दिवसात 100 कोटींवरून 150 कोटींचा आकडा झाला आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील पुढाऱ्यांवर जबाबदारी
यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. अमित शाह कितीवेळा मुंबईत आले? अमित शाह वारंवार मुंबईत का येतात? काय व्यवहार चालले आहेत? खासदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी हा पैसा मुंबईतून जाणार आहे. याची जबाबदारी मुंबईतील, महाराष्ट्रातील काही प्रमुख पुढाऱ्यांवर दिली आहे. ही रक्कम चिंता करण्यासारखी नाही. 5 वर्षापूर्वी 50 कोटीला आमदार आणि 75 कोटीला खासदार विकला गेला होता. त्यामुळे 150 कोटी ही सन्मानीय रक्कम आहे. चांगली रक्कम दिली आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.
आमचे खासदार 80 कोटीला
आमचे सहा खासदार गेले होते. ते प्रत्येकी 80 कोटीला विकले गेले. पण त्यांना निवडून आल्यावर 15 कोटी आधीच मिळाले होते. हे एकनाथ शिंदेंचं डील होतं. आताचा भाव हा राष्ट्रीय भाव आहे. जसं नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा भाव आहे, तसा हा पॉलिटिकल नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा भाव आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.