ही शेवटचीच भेट… जरांगे यांची तब्येत कशी? मोठी अपडेट आली समोर; उद्या तर…

मुंबईला जाण्याचे जे मार्ग ठरले आहेत. त्याच रस्त्याने मी जाणार आहे. मुक्कामही जे ठरले तिथेच मुक्काम होईल. त्यात बदल होणार नाही. तुम्ही जेवणासाठी आणलेलं साहित्य आणलं असेल. ते तयार करू नका. त्यामुळे ते वाया जाणार नाही. हे साहित्य नंतर मुंबईत वापरता येईल, असं मनोज जरांगे म्हणाले.

ही शेवटचीच भेट... जरांगे यांची तब्येत कशी? मोठी अपडेट आली समोर; उद्या तर...
Manoj Jarange
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 14, 2026 | 2:49 PM

मनोज जरांगे पाटील गेल्या 17 दिवसापासून उपोषण करत आहेत. मधल्या काळात सरकार आणि समाजाच्या आवाहना खातर जरांगे यांनी उपचार सुरू केले होते. पण सरकारकडून मागण्या मान्य होत नाहीत, सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने जरांगे यांनी परत एकदा उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जरांगे यांची प्रकृती बिघडू लागली आहे. त्यांच्या पोटात आणि पायात आग होत आहे. थकवा जाणवत आहे. शरीरात उद्या आणखी बदल होण्याची शक्यता आहे. तशी माहितीच मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. तसेच ही कदाचित माझी शेवटचीच भेट असेल, असं जरांगे यांनी म्हणताच सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकला.

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेऊन आपल्या प्रकृतीची अपडेट दिली. सध्या 17 दिवसाच्या उपोषणाच्या काळात 7-8 दिवस सलग सलाईन लावल्याने तरतरी यायची. शुगर मेंटेन होत होती. बीपी, ऑक्सिजन मेंटेन होत होते. काल सकाळपासून सलाईन आणि पाणी सोडलं. पुन्हा एक एक-दोन दोन तासाने शरीरात बदल होणार आहे. आधी थोडा त्रास झाल्यावर सलाईनमधून औषध दिलं जायचं. त्यामुळे तरतरी येत होती. सरकारला आणि सर्वांना वाटत होतं माझी तब्येत चांगली आहे. पण सलाईन काढल्याने त्रास सुरू झाला आहे. पोटात आणि पायात आग व्हायला सुरुवात झाली आहे. उद्या तर आणखी त्रास होणार आहे, अशी माहिती जरांगे यांनी दिली.

सलाईनवरच जिवंत

उद्या मी एकटाच मुंबईला जायला निघणार आहे. यावेळी जागोजागी हारतुरे देऊन माझा सत्कार करू नका. हार घातल्याने मला इन्फेक्शन होईल. शुगर, बीपी वाढू शकतो. आता पर्यंत मी सलाईनवर जिवंत होतो. सलाईनच्या जीवावर बोलत होतो. सलाईन काढली तर मी पुन्हा पूर्ण थकून जातो. त्यामुळे प्रत्येक चौकात, रोडच्या बाजूलाच तुमचं व्यासपीठ असावं. म्हणजे मला आराम करून पुढे जाता येईल, असं आवाहन जरांगे यांनी केलं.

अन् डोळ्यातून अश्रू

माझा पाच सहा दिवसांचा जीवघेणा प्रवास आहे. प्रवासात मध्ये काहीही होऊ शकतं. ही कदाचित माझी शेवटचीच भेट आहे. शक्य असेल तरच मला निरोप द्यायला या, असं सांगताना मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले. पुन्हा भेट होईल की नाही माहीत नाही. त्यामुळे समाजाने माझ्या प्रवासाकडे लक्ष ठेवा, असंही ते म्हणाले.

विना परवानगीच येणार

मी आता एकटाच मुंबईला जातो. योग्यवेळी तुम्हाला मुंबईला बोलावलं जाईल. मुंबईला जाण्याचे पाच टप्पे ठरले आहेत. या पाच टप्प्यात मुंबई गाठायची आहे. एकाच दिवशी सर्वांचा घात झाला तर समाज हारतो. म्हणून तुम्हाला थांबायला सांगितलं. पण मी थांबलो का? मी चाललो. आता कसे अडवतात बघतो. कोण आझाद मैदानात परवानगी देत नाही हे पण बघतो. मराठ्यांची गर्दी होणार म्हणून परवानगी नाकारली ना? आता मी एकटाच आहे. आता नाक आहे का परवानगी नाकारायला? आता परवानगी नाकारली तर करोडो मराठे विना परवानगी मुंबईत धडकतील, असा इशाराच जरांगे यांनी दिला.

तोडीस तोड डाव…

मी ज्या मार्गाने जाणार आहे. त्या मार्गावर आशीर्वाद द्यायला या. आले तरी चालेल. नाही आले तरी चालेल. मला भेटायला यायचे असेल तर वर्गणीच्या पैशाचा वापर करू नका. ते पैसे आणि बस मुंबईला जाण्यासाठीच राखीव ठेवायच्या आहेत. मुंबईला येण्याची तारीख दोन दिवस आधी सांगितली जाईल. महिलांनी अधिकाधिक महिलांना घेऊन यायचे आहे. मला तोडीस तोड डाव टाकायचा आहे, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us