औरंगाबाद शहराची तहान भागली, जायकवाडी धरणाची पाणी पातळी 60 टक्क्यांच्या पुढे, हर्सूल तलावही तुडुंब

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने शहरातील हर्सूल तलावदेखील तुडुंब भरला आहे. हर्सूल तलाव भरल्याने शहरातील 16 पेक्षा जास्त वॉर्डांमधील पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

औरंगाबाद शहराची तहान भागली, जायकवाडी धरणाची पाणी पातळी 60 टक्क्यांच्या पुढे, हर्सूल तलावही तुडुंब
गेल्या आठवड्यातील पावसाने नाथसागर आणि हर्सूल तलावाची पाणी पातळी समाधानकारक वाढली.

औरंगाबाद: मागील आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या मौसमातील जिल्ह्यातील हा पहिलाच दमदार (Heavy rainfall in Nashik and Aurangabad) आहे. त्यामुळे परिसरातील 12 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या धरणांतून 8.14 टीएमसी पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. आज मंगळवारी सकाळी झालेल्या नोंदणीनुसार धरणाची पातळी 60.58 टक्के झाली होती. अजूनही धरणात पाण्याची आवक सुरु होती.

नाशिक परिसरातील धरणांतून विसर्ग

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने नाशिक जिल्ह्यातील 24 पैकी 12 धरणांतून विसर्ग सुरु झाला आहे. गंगापूर धरण 98.56 टक्के भरले असून त्यातून विसर्ग सुरु झाला आहे. सोमवारी यंदाच्या हंगामातील उच्चांकी म्हणजेच 4009 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. दारणा धरणातून 7200 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु झाला. नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातूनही 23 हजार 905 क्युसेकने गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. या विसर्गामुळे नांदूर-मध्यमेश्वरमधून 94 हजार 254 क्युसेक म्हणजेच तब्बल 8.146 टीएमसी पाणी गोदावरीतून जायकवडीच्या दिशेने झेपावले आहे.

औरंगाबाद शहराची तहान भागली

गेल्या आठवड्यातील पावसामुळे नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरत आले आहे. त्यामुळे नाशिक शहराची पाण्याची चिंता मिटणार आहे. तसेच शहरवासियांना पाणी कपातीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. अजूनही या परिसरात काही भागात पाऊस सुरु असल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु राहणार आहे. हे पाणी जायकवाडी प्रकल्पासाठी उपयुक्त ठरते. जायकवाडीच्या धरणावर औरंगाबादचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने दोन्ही शहरांतील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

शहरातला हर्सूल तलाव तुडुंब

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने शहरातील हर्सूल तलावदेखील तुडुंब भरला आहे. तलावाचे सौंदर्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या तलावाची उंची 28 फूट आहे. हर्सूल तलाव भरल्याने शहरातील 16 पेक्षा जास्त वॉर्डांमधील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मागील वर्षीही तलाव पूर्णपणे भरला होता. त्यामुळे उन्हाळा संपेपर्यंत शहरवासियांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते.

पूर्वी औरंगाबादेत हर्सूल तलावाचेच पाणी

1975 सालापर्यंत औरंगाबाद शहराला हर्सूल तलावाद्वारेच पाणी पुरवठा केला जात होता. तसेच शहरातील ऐतिहासिक नगरींद्वारेही पाणी पुरवले जात होते. मात्र कालानुरूप शहराची लोकसंख्या वाढत गेल्याने जायकवाडीतून पाणी आणणे सुरु झाले. तसेच हर्सूल तलावातून होणारा पाणीपुरवठादेखील सुरु आहे. शहरातील 16 पेक्षा जास्त वॉर्डांना आजही हर्सूल तलावातूनच पाणी पुरवले जाते. सध्याच्या घडीला महानगरपालिकेकडून या तलावातून दररोज 5 एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो.

इतर बातम्या- 

मांजरा धरणाची शंभरीकडे वाटचाल, तीन जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी

खडकवासला धरण 100 टक्के भरलं, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, पुणेकर निर्धास्त!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI