खवड्या डोंगरप्रकरणात दुसरा अँगल समोर, कुणालची ती एक चूक अन्… मोठा ट्विस्ट काय?

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर आयफोनच्या हट्टामुळे एका कुटुंबाचा दुःखद अंत झाला. मुलाने जागा बदलण्याची केलेली चूक बचावकार्यात अडथळा ठरली आणि होत्याचं नव्हतं झालं. वडील वाचवायला गेले असता त्यांचा तोल गेला, तर आईनेही उडी घेतली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून, त्यामागील धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

खवड्या डोंगरप्रकरणात दुसरा अँगल समोर, कुणालची ती एक चूक अन्... मोठा ट्विस्ट काय?
Khawdya Hill Tragedy
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 22, 2026 | 6:13 PM

छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव येथील खवड्या डोंगरावर तिघा मायलेकरांचा पडून मृत्यू झाल्याच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. मुलाच्या हट्टामुळे अख्खं कुटुंबच उद्ध्वस्त झालं. डोंगरावरून मुलाचा तोल गेला म्हणून वडील वाचवायला पुढे गेले अन् तेही खाली कोसळले. हे पाहून आईनेही उडी मारली आणि तिचाही मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडालेली असतानाच आता याबाबतच्या काही माहिती समोर येत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते कुणाल वाचू शकला असता. पण त्याची एक चूक नडली अन् पूर्ण कुटुंब होत्याचं नव्हतं झालं.

कुणाल चांदगुडे याला आयफोन हवा होता. आयफोनसाठी त्याने घरातल्यांशी भांडण केलं. त्यानंतर तो रागाच्या भरातच ट्युशनला जायचं म्हणून घराच्या बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ त्याचे आईवडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगिता चांदगुडे हे सुद्धा घराच्या बाहेर पडले. कुणाल तिसगावमधल्या खवड्या डोंगरावर गेला. तिथे डोंगराच्या टोकावर उभा राहिला. घरचे त्याला समजावत होते. त्याला बाजूला व्हायला सांगत होते. तब्बल तीन तास त्याला समजावण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याचा हट्ट पुरवण्याचं आश्वासनही घरच्यांनी दिलं. पण तो ऐकायला तयार नव्हता.

वारंवार जागा बदलली अन्…

एव्हाना अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले. पोलीसही घटनास्थळी आले. त्यांनी धोका ओळखून डोंगराच्या खाली जाळ्या लावल्या. पण कुणाल वारंवार जागा बदलत होता. वडील त्याला समजावत होते. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानही त्याला वारंवार समजावत होते. एका क्षणी कुणालचा रागही शांत झाला. त्याचं मन वळवलं गेलं होतं. त्याचे वडील त्याला पकडायला गेले अन् दोघांचा तोल जाऊन खाली पडले. हे दृश्य पाहून कुणालच्या आईनेही डोंगरावरून उडी मारली. त्यात तिघा मायलेकांचा मृत्यू झाला. कुणालला ओढण्यात त्याच्या वडिलांना यश आलं असतं. पण तो वारंवार जागा बदलत असल्याने अंदाज चुकला गेला. त्यामुळे तोल गेला आणि दोघांचाही मृत्यू झाला. कुणाल जागा बदलत असल्याने अग्निशमन दलालाही जागा बदलावी लागली. तो कधी कोणत्या जागेवर जाईल याचा अंदाज येत नव्हता. कुणालने वारंवार जागा बदलण्याची चूक केली नसती तर कदाचित तो वाचला असता, असं काहींचं म्हणणं आहे.

मला मरायचंच आहे

कुणालचं वय 18 वर्ष होतं. तो आईवडिलांचं ऐकत नव्हता. तो पाच फूट अंतरावर होता. तो वारंवार जागा बदलत होता. आईशी संवाद साधत होता. आईही त्याला वारंवार समजावत होती. तीन तास त्याला समजावून सांगत होते. वडील खालून त्याला समजावत होते. त्यानंतर वडील वर गेले आणि त्यानंतर ही घटना घडली, असं प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक माजी सरपंच संजय जाधव यांनी दिली. आईकडे बघ. तू शिकलेला आहे. अनाडी नाही. आईवडिलांना सांभाळ असं आम्ही त्याला सांगत होतो. पण तो ऐकायला तयार नव्हता. मला मरायचंच आहे, असं तो म्हणत होता, अशी माहिती संजय जाधव यांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us