पॅरिसमधून रात्रभर सूत्रे हलली अन् जरांगेंनी उपोषण सोडलं; इन्साईड स्टोरी आली समोर

मनोज जरांगे पाटील यांनी अखेर 20 दिवसांचं उपोषण सोडलं. पॅरिसमधून सूत्रं हलली आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ही मध्यस्थी केली. मराठा आरक्षण आंदोलनाची ही इन्साईड स्टोरी समोर आली आहे. गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी जरांगेंनी एक पाऊल मागे घेतल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

पॅरिसमधून रात्रभर सूत्रे हलली अन् जरांगेंनी उपोषण सोडलं; इन्साईड स्टोरी आली समोर
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 17, 2026 | 12:22 PM

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : मनोज जरांगे पाटील यांनी अखेर 20 दिवसाच्या आमरण उपोषणाला पूर्ण विराम दिला आहे. सरकारच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी आज पहाटे उपोषण सोडलं. जरांगे यांनी उपोषण सोडण्यासाठी काल दिवसभर आणि रात्रभर खलबतं सुरू होती. अखेर त्याला यश आलं आहे. जरांगे यांनी उपोषण सोडावं म्हणून थेट पॅरिसमधून हालचाली झाल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जरांगेंनी उपोषण सोडावं म्हणून पॅरीसमधून कोण हालचाल करत होतं? अशी चर्चा या निमित्ताने रंगली असून या आंदोलनामागची इन्साईड स्टोरीही समोर आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावं म्हणून मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड, दादा भुसे आणि आमदार सुरेश धस हे प्रयत्न करत होते. हे नेते जरांगेना भेटण्यासाठी पहाटेच बीडला गेले होते. यावेळी जरांगेंशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. तसेच काही मागण्यांसाठी जरांगेंकडून वेळ मागून घेण्यात आल्या. जरांगे यांनीही त्याला सहमती दर्शवली आणि जरांगेंच्या उपोषणाची सांगता झाली. ऐन गणेशोत्सवात मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जरांगे यांनीही एक पाऊल मागे घेतल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. जरांगे यांच्या या निर्णयाचं स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वागत केलं.

अन् पॅरीसमधून सूत्रे हलली

जरांगे यांच्याशी बीडच्या पाटोद्यात सरकारचे चार नेते चर्चा करत होते. पण त्याचवेळी दुसरीकडे पॅरिसमधूनही सूत्रे हलत होती. पॅरिसमधून साडेतीन तास मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर जरांगे यांनी आंदोलनाला अर्धविराम देण्याचा निर्णय घेतला. राज्याचे उद्योगममंत्री उदय सामंत हे पॅरिसमध्ये आहेत. ते पॅरिसमधून जरांगे यांच्या सहकाऱ्यांच्या संपर्कात होते. जरांगे आणि सामंत यांची मैत्री सर्वश्रूत आहे. त्यामुळेच सामंत यांनी पॅरीसमधून सूत्रे हलवली. सामंत यांनी पॅरीसमधून जरांगे यांच्या सहकाऱ्यांशी साडे तीन तास चर्चा केली, त्यानंतर जरांगे यांनी माघार घेतली.

काय घडलं पडद्या मागे?

जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी काल दिवसभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी किमान 7 वेळा चर्चा केली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही सामंत यांनी सातवेळा चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वरिष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड आणि उदय सामंत ह्यांच्यामध्ये कॉन्फरन्स कॉलवर चर्चा झाली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांशी उदय सामंत यांची चर्चा झाली. त्यानंतर जरांगे यांनी आंदोलन मागे घेण्यास होकार दर्शवला आणि गेल्या 20 दिवसापासूनचं उपोषण सुटलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us