मोठी बातमी! जरांगेंच्या प्रश्नांवर आज निर्णायक तोडगा? तातडीची बैठक; संभाजीनगरात मोठ्या घडामोडी

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने मराठा आरक्षण प्रश्न गंभीर झाला आहे. जरांगेंची प्रकृती खालावत असून राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत जरांगेंच्या मागण्यांवर आणि मराठा आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! जरांगेंच्या प्रश्नांवर आज निर्णायक तोडगा? तातडीची बैठक; संभाजीनगरात मोठ्या घडामोडी
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 09, 2026 | 10:47 AM

मनोज जरांगे पाटील हे गेल्या 11 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. जरांगेंनी अन्नपाणी सोडल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली असली तरी त्यांच्या प्रकृतीत म्हणावा तसा फरक पडलेला नाही. त्यातच मराठा समाज अधिक आक्रमक झाला असून राज्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आणि बंद पुकारला जात आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवरही दबाव वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज छत्रपती संभाजीनगरात तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत जरांगे यांच्या प्रश्नावर निर्णायक तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाजी नगरात मोठ्या घडामोडी घडणार असून याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

सरकारचे शिष्टमंडळ, माजी न्यायमूर्ती शिंदे समिती आणि मराठा आरक्षण अभ्यासकांची आज छत्रपती संभाजीनगरात महत्त्वाची बैठक पार पडत आहे. स्मार्ट सिटी कार्यालयात ही बैठक होत आहे. त्यामुळे या कार्यालया भोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. आजच्या बैठकी हैदराबाद गॅझेटनुसार मिळालेल्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र काढताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

जरांगे उपोषण मागे घेणार?

या बैठकीला सरकारकडून कोण उपस्थित असणार हे अद्याप समोर आलेलं नाही. कालच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि भाजप आमदार प्रसाद लाड हे छत्रपती संभाजी नगरात आले होते. त्यांनी मराठा आरक्षण अंमलबजावणीचा आढावा घेतला आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते आजच्या बैठकीला उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच आजच्या या महत्त्वाच्या बैठकीनंतर जरांगे पाटील यांचे समाधान होणार का? जरांगे उपोषण मागे घेणार का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.

नांदेडमध्ये रास्ता रोको

दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज आक्रमक झाला आहे. नांदेड -नागपूर महामार्गांवर सकल मराठा समाजाने आज रास्ता रोको आंदोलन केलं. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे रस्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी दोन्ही बाजूकडचा महामार्ग अडवला. जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करण्याच्या मागणीसाठी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकार आणि राधाकृष्ण विखे पाटलांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सोलापुरात शोलेस्टाईल आंदोलन

तर, जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापुरात मराठा बांधवांनी शोले स्टाईल आंदोलन केले. सोलापूर विद्यापीठा समोरील पाण्याच्या टाकीवर चढून मराठा समाजातील युवकांनी आंदोलन केले. जरांगे यांच्या आंदोलनाची सरकारने तत्काळ दखल घ्यावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत मागण्या मान्य होतं नाहीत, तोवर टाकीच्या खाली उतरणार नाही, असा इशाराच आंदोलकांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us