Marathwada Rain Update : मराठवाड्याच्या पावसाची दमदार बॅटिंग, औरंगाबादमध्ये मुसळधार, परभणीत ढगफूटीसदृश्य, बीडमध्ये सर्वदूर पाऊस

हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. हवामान विभागाचा इशारा खरा ठरला असून सोमवारी रात्री झालेल्या पावसानं मराठवाड्यात दमदार बॅटिंग केली आहे.

Marathwada Rain Update : मराठवाड्याच्या पावसाची दमदार बॅटिंग, औरंगाबादमध्ये मुसळधार, परभणीत ढगफूटीसदृश्य, बीडमध्ये सर्वदूर पाऊस
मराठवाड्यात दमदार पाऊस


औरंगाबाद: हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. हवामान विभागाचा इशारा खरा ठरला असून सोमवारी रात्री झालेल्या पावसानं मराठवाड्यात दमदार बॅटिंग केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड ते चाळीसगाव मार्गावर दरड कोसळली. तर परभणीच्या पाथरी तालुक्यातील हदगाव आणि कासापूरी मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. लातूरच्या निलंगा आणि औसा तालुक्यात पावसानं दाणादाण उडवली. जालना जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आसून घनसावंगी अंबड जालना जाफराबाद तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. बीड जिल्ह्यात ही पावसानं सर्वदूर हजेरी लावली आहे. हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण परिसरात जोरदार पाऊस झाला. नांदेडमध्ये पावसानं जोरदार बँटिंग केलीय. उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे.

औरंगाबादच्या कन्नड घाटात दरड कोसळली, पैठण तालुक्यात जोरदार पाऊस

औरंगाबाद धुळे रोडवर कन्नड घाटात रात्री मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली. या दरडीखाली म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रकवर ही दरड कोसळली. या घटनेत ट्रक ड्रायव्हर मृत्युमुखी पडला असून या घटनेत अनेक म्हशीना आपला जीव गमवावा लागला आहे. कन्नड ते चाळीसगाव रस्त्यावर आशा दरड कोसळल्याने रास्ता संपूर्णपणे बंद झालेला आहे. सध्या पाऊस थांबला असल्याने रास्ता कसा सुरू करता येईल असा प्रयत्न होत असला तरी पुन्हा पाऊस झाल्यास स्थिती बिकट होऊ शकते.

पैठण तालुक्यात मुसळधार

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. गोदावरी नदी वरील हिरडपुरी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. बंधाऱ्यातील पाणी कधीही सोडले जाण्याची शक्यता आहे. बंधाऱ्याखालील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. पाचोड परिसरात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना जोरदार पूर आला आहे. नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे काही गावात पुराचे पाणी शिरले आहे. पाचोड खुर्द सह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

परभणीच्या पाथरी तालुक्यात हदगाव आणि कासापूरी मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस

परभणीच्या पाथरी तालुक्यात आज ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यात हदगाव आणि कासापूरी मंडळात झालेल्या जोरदार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले. सर्वाधिक परिणाम हदगाव मंडळात झाला असून नदीला आलेल्या पुरामुळे साखल भागातील घरांमध्ये पाणी साचले. काही नागरिकांच्या घरात दोन ते तीन फूट पाणी साचल्याने संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेती पिकांचेही नुकसान झाले आहे.

हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरण परिसरात जोरदार पाऊस

हिंगोली सिद्धेश्वर धरण परिसरात रात्री पासून जोरदार पाऊस होत असल्याने सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरलं. यामुळे धरणाचे दोन दरवाजे उडघडण्यात आले आहेत. धरणातून 1456 क्यूसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. पूर्णा नदीच्या दोन्ही तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलाय.

लातूर जिल्ह्यात दमदार पाऊस

लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसाने शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पाऊस आणि वाऱ्यामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांचा ऊस आडवा पडला आहे. तर, सोयाबीन,तूर आणि कांदा पिकांचंही नुकसान झालं आहे. निलंगा आणि औसा भागात मोठा पाऊस झाला आहे, या पावसाने काही ठिकाणची पिकं वाहून गेली आहेत. तर, जिल्ह्यातल्या इतर भागातील शेतकरी या पावसाने सुखावला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. या पावसाने आता पिकांना जीवदान मिळाले आहे.

लातूर जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे , या पावसाने ओढ्याला आलेल्या पुरात निलंगा तालुक्यातल्या जाऊ गावचा शेतकरी वाहून गेला आहे . शेतावरून घरी परतताना जुबेर शेख हे 34 वर्षीय शेतकरी तोल जाऊन ओढ्यात पडले , ओढ्याला पूर आलेला असल्याने जुबेर शेख हे वाहून गेले . जुबेर यांचा मृतदेह दोन तासांनी गावकऱ्यांच्या हाती लागला आहे . निलंगा आणि औसा तालुक्यात मोठा पाऊस झाला आहे तर जिल्ह्यात इतर ठिकाणी बऱ्यापैकी भिज पाऊस झाला आहे .

जालना जिल्ह्यातील जाफराबादमध्ये जोरदार पाऊस

जालना जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आसून घनसावंगी अंबड, जालना ,जाफराबाद तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. अनेक ठकाणी पुलावरून पाणी वाहत आहे.

बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजा वरून मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यात कालपासून पावसाने हजेरी लावलीय. जवळपास 25 दिवसांच्या खंडानंतर पावसाने कमबॅक केलं आहे. मात्र सध्या सुरू असलेला पाऊस हा खरिपाच्या तोडणीला आलेल्या पिकांसाठी नुकसानदायी ठरतोय. काल दुपार पासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झालीय. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला, जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील राजेवाडी येथील बंधारा दुथडी भरून वाहत आहे. तर परळी, बीड, गेवराई आणि माजलगाव तालुक्यात चांगल्या पावसाने हजेरी लावलीय. तर 25 दिवस पावसाने ओढ दिल्यानं खरिपाची पिकं धोक्यात आली होती. आता जी पिकं ऐन काढणीला आली होती त्याच मात्र यात नुकसान झाले आहे.

काल मध्यरात्री रात्री झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील कुंडलिका नदिला पुर आला आहे. तर आंबेसावळी नदी देखील खळखळून वाहत आहे. बीडच्या बिंदुसरा नदीला देखील पाणी आले आहे. जिल्ह्यातील सर्वच नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मध्यरात्री झालेल्या या पावसामुळे ऊसासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक नदीपात्र यंदा सफाई केलीच नसल्याने अनेक गावांना पुराचा तडाखा बसण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही.

नांदेडमध्ये रिमझिम पाऊस

नांदेड जिल्ह्यात रात्रीपासून सुरू झालेला रिमझिम पाऊस आज सकाळ पर्यंत सुरूच आहे. जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पावसाने सर्वदूर हजेरी लावलीय. गेल्या दहा दिवसापासून गायब असलेल्या वरुणराजाने हजेरी लावल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळालाय. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकाला या पावसाने जीवदान मिळालंय, त्यातच उकाड्यापासून हैराण असलेल्या सर्वसामान्यांना देखील दिलासा मिळालाय.

उस्मानाबादमध्ये रिमझिम पाऊस

उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पाऊस पाऊस पडल्याने वातावरण ढगाळ असल्यानं गारवा निर्माण झाला आहे.

इतर बातम्या:

Mumbai rains: मुंबईसह ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी, पुढील तीन दिवस पावसाचेच; ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी

Mumbai rains Maharashtra rain Live : कन्नड घाटात म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दरड कोसळली, ड्रायव्हरसह अनेक म्हशींचा मृत्यू

Marathawada Weather Report heavy rain fall in all districts including Aurangabad Beed Parbhani Jalna Latur

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI