बीडः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचेच नेते कोंडीत सापडले आहेत. लग्न समारंभातील कन्यादानाच्या विधीवर भाष्य करताना कन्या हा काय दान करण्याचा विधी असतो का, असं वक्तव्य करून अमोल मिटकरी चांगलेच वादात अडकले आहेत. सांगलीत ज्या ठिकाणी मिटकरींनी हे वक्तव्य केलं, तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि जयंत पाटीलदेखील (Jayant Patil) उपस्थित होते. विषय होता मनसे आणि हनुमान चालिसाचा. अमोल मिटकरी जोशात आले. भराभर हनुमान चालिसा म्हणून दाखवू लागले. त्यानंतर लगेच ते अन्य काही श्लोकांवर उतरले. त्यानंतर त्यांनी लग्नात म्हणल्या जाणाऱ्या श्लोकांचा उच्चार केला. यावेळी त्यांनी एका लग्नातला अनुभव सांगितला. मिटकरी म्हणाले, ‘त्या लग्नात गुरुजींनी श्लोक म्हटले. नवरा-नवरीचे हात हातात देत.. मम भार्या समर्पयामि.. असं म्हणाले आणि मी मित्राच्या कानात त्याचा अर्थ सांगितला. माझी पत्नी घेऊन जा.. अरे कधी सुधारणार… असं म्हटलो’. अमोल मिटकरी यांनी सांगितलेल्या या प्रसंगावर भर सभेत एकच हशा पिकला. पण या सर्व वक्तव्यावरून अमोल मिटकरी आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत.