औरंगाबादेत भगवा दिनाच्या उपक्रमाला पहिल्यांदाच ब्रेक! शिवसनेने महाआरती टाळली, भाजप नेत्यांनाही रोखले!
शिवसेनेतर्फे दरवर्षी 6 डिसेंबर रोजी औरंगाबादमध्ये साजरा केला जाणारा भगवा दिन यंदा झाला नाही. बाबरी मशीद पाडल्यामुळे या दिवशी शिवसेना हिंदुत्ववादी संघटनांचे नेतृत्व करत महाआरती करत असे. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे या उपक्रमाला पहिल्यांदाच ब्रेक लागला.

औरंगाबादः 6 डिसेंबर रोजी बाबरी मशीन पाडल्याबद्दल मागील 28 वर्षांपासून औरंगाबादेत शिवसेनेच्या (Aurangabad Shivsena) नेतृत्वाखाली शौर्य दिन किंवा भगवा दिन साजरा केला जातो. सुपारी हनुमान मंदिरात या दिवशी एकत्रितपणे महाआरती केली जात होती. मात्र यंदा राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकत्रित असल्यामुळे शिवसेनेने या महाआरतीला ब्रेक दिला. युतीमध्ये फाटाफूट झाल्याने भाजपने दक्षिणमुखी मारूती मंदिरासमोर आरती करण्याचे सुरु केले होते. मात्र या वर्षी भाजपने (BJP) शिवसेनेच्या हक्काच्या सुपारी हनुमान मंदिरात महाआरती घेण्याची घोषणा केली होती.
भाजप शहराध्यक्ष संजय केणेकरांना रोखले
सुपारी हनुमान मंदिरात महाआरती करण्याची घोषणा भाजपने केली होती. मात्र पोलिसांनी 5 डिसेंबरपासूनच त्यांच्यावर पाळत ठेवली होती. महाआरतीस निघण्यापूर्वीच 6 डिसेंबर रोजी उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयात त्यांना ताब्यात घेण्यात आले. वेदांत नगर पोलिस ठाण्यात त्यांना काही काळ स्थानबद्ध करण्यात आले. महाविकास आघाडी सरकार पोलिसांना पुढे करून राज्यात हिंदूंना दडपण्याचे काम करीत असल्याचा आरोप केणेकर यांनी केला आहे.
खैरे म्हणतात, कोरोनामुळे महाआरतीला ब्रेक
दरम्यान, शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी महाआरतीला ब्रेक देण्यासाठी कोरोनाचे कारण सांगितले. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम सुरु झाले आहे, शिवसेनेने त्यासाठी एक कोटींचा निधी दिला आहे. मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरात महाआरती करु, अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम आहे. हिंदूत्व सोडण्याचा प्रश्नच नाही, असेही ते म्हणाले.
दानवे म्हणाले उपक्रमाचे औचित्य संपले
शिवसेना दरवर्षी 6 डिसेंबर हा दिवस भगवा दिन किंवा शौर्य दिन म्हणून साजरा करते. मात्र आता न्यायालयाच्या आदेशाने अयोध्येत मंदिराचे बांधकाम सुरु आहे. आमचा संकल्प पूर्णत्वास गेला आहे. त्यामुळे हा उपक्रम साजरा करण्याचे औचित्य उरले नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे यांनी दिली.
इतर बातम्या-
