
Ajit Pawar IPS Anjana Krushna Viral Video : अवैध मुरूम उत्खनन थांबवण्यासाठी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा गेल्यानंतर त्यांना फोन कॉलच्या माध्यमातून कारवाई थांबवण्याचा आदेश दिल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून हे प्रकरण तापल्यामुळे अजित पवार यांनी उत्खननावेळी तणाव वाढू नये म्हणून मी काळजी घेत होतो, असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, अजित पवार आणि पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांचे संभाषण घडवून आणणारा अजितदादांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा आता एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे आता या कार्यकर्त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बाबा जगताप हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा माडा तालुका अध्यक्ष आहे. कुर्डू गावामध्ये कथित अवैध पद्धतीने मुरूम उपसा चालू असताना अंजना कृष्णा यांनी रोखल्यानंतर याच बाबा जगताप याने अजित पवार यांना कॉल करून त्यांचे अंजना कृष्णा यांच्याशी संभाषण घडवून आणले होते. त्यानंतर अजित पवार यांनी अंजना कृष्णा यांना चांगलेच दरडावून सांगत सध्या सुरू असलेली कारवाई थांबवा असा आदेश फोन कॉलद्वारे दिला होता. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून हा आदेश द्या, असे म्हटल्यानंतर अजित पवार यांनी अंजना कृष्णा यांना चांगलेच सुनावले होते. मी राज्याचा उपमुख्यमंत्री बोलतोय. मी तुमच्यावर कारवाई करेन, असेही यावेळी अजित वार यांनी अंजना कृष्णा यांना खडसावून सांगितले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील मोबाईल संभाषणचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणावरून अजित पवारांना जाहीर माफी मागावी लागली आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या बाबा जगताप या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या नव्या व्हायरल व्हिडिओमुळे आणखी अडचणी वाढल्या आहेत. अजित पवारांना फोन लावून देणाऱ्या तालुका अध्यक्ष बाबा जगताप याचा कथितपणे नशा करणारा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका खुर्चीवर बसल्याचे दिसत आहे. त्याच्या समोर एक टेबल आहे. खुर्चीवर बसून तो कशाचीतरी नशा करताना दिसत आहे. विशेष म्हणजे नशा करताना वापरत असलेले साधनही तो व्हिडीओत दाखवताना दिसत. बाबा जगतापचा हा व्हिडीओ समोर आल्यामुळे आता त्याच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. पोलीस आता या प्रकरणी नेमकी कोणती कारवाई करणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.