धनंजय मुंडेंना डावलून बीडमध्ये मोठा पक्ष प्रवेश? नेमकं काय घडतंय?

आज बाबरी मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, मात्र धनंजय मुंडे यांना डावलून हा पक्ष प्रवेश होत असल्याची चर्चा बीड जिल्ह्यात सुरू आहे.

धनंजय मुंडेंना डावलून बीडमध्ये मोठा पक्ष प्रवेश? नेमकं काय घडतंय?
| Updated on: Aug 07, 2025 | 3:49 PM

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे, वडवणीतील राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा आज  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षात प्रवेश होणार आहे. मात्र माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते धनंजय मुंडे यांना डावलून हा पक्ष प्रवेश होत असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. बीडच्या वडवणी शहरात आज सायंकाळी साडेपाच वाजता राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे हे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत.

आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश होणार आहे. मात्र पक्ष प्रवेशाच्या बॅनरवर कुठेही आमदार धनंजय मुंडे यांचा फोटो किंवा नाव न छापण्यात आल्यानं  चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित राहणार की नाही? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अजित पवार बीड दौऱ्यावर

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे कालपासून बीड दौऱ्यावर आहेत. आज विविध विकास कामांची ते पाहणी करणार असून, दोन ठिकाणी मेळावे होणार आहेत. सर्वांचं लक्ष वडवणी शहरात होत असलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांचे मानसपुत्र आणि 35 वर्षे सोबत राहिलेले बाबरी मुंडे यांच्या पक्षप्रवेशाकडे लागलं आहे. विशेष म्हणजे आमदार धनंजय मुंडे यांना डावलून हा पक्ष प्रवेश होत आहे. कार्यक्रमाच्या बॅनर आणि पत्रिकेवर कुठेही त्यांचं नाव किंवा धनंजय मुंडेंचा फोटो लावण्यात आलेला नाहीये. त्यामुळे या कार्यक्रमासाठी आमदार धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नेमकं काय म्हणाले बाबरी मुंडे?

यापूर्वी काय झालं? यापेक्षा यापुढे काय करायचं? हे ठरवून आम्ही पक्षात प्रवेश करत आहोत.
आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्ष प्रवेश करत आहोत. आम्ही इतर कोणालाही निमंत्रण दिलेलं नाही. आमदार धनंजय मुंडे आले तर आम्ही, जो कोणी पदाधिकारी कार्यकर्ता असेल त्याचा प्रोटोकॉल प्रमाणे सत्कार करू. आमदार  धनंजय मुंडेंसोबत किंवा त्यांच्या कुठल्याही लोकांसोबत आमचं काहीही बोलणं झालेलं नाही, असं यावेळी बाबरी मुंडे यांनी म्हटलं आहे.