Bachchu Kadu : चिंता वाढली… तर बच्चू कडू यांच्या जीवाला धोका, डॉक्टरांची माहिती; कार्यकर्त्यांना टेन्शन
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचे सुरू असलेले उपोषण आज सातव्या दिवशीही कायम आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असून, तिवसा ग्रामीण रुग्णालयाने तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. राजकीय नेते त्यांची भेट घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. उपोषणस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त आहे. कडू यांच्या पुढच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांनी अन्नाचा एक कणही तोंडात घेतलेला नसून पोटात काहीही नसल्याने त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांना प्रचंड उलट्या झाल्या होत्या, मात्र त्यानंतरही ते त्यांच्या आंदोलनावर ठाम असून आज 7 दिवस उलटूनही त्यांनी काहीच खाल्लेलं नाही. याच पार्श्वभूमीवर कडू यांच्या प्रकृतीबाबत तिवसा ग्रामीण रुग्णालयाचा अहवाल समोर आला आहे.
बच्चू कडू यांना तात्काळ अतिदक्षता विभाग मध्ये दाखल करण्याची आवश्यकता असून त्यांना तातडीने वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचे तिवसा ग्रामीण रुग्णालयाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ‘बच्चू कडू यांच्यावर तातडीने अतिदक्षता विभाग मध्ये उपचार केले नाहीत, तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो’ अशी माहितीही डॉक्टरांनी दिली असून त्यामुळे कार्यकर्त्यांचे टेन्शन प्रचंड वाढलं आहे. मात्र त्यानंतरही कडू हे आंदोलनावर ठाम असून काहीही खाण्यास नकार दिला आहे.
आंदोलनास्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप
दरम्यान कडू यांच्या अमरावतीमधील अन्नत्याग आंदोलन स्थळी 200 पेक्षा अधिक पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलन स्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप आलं आहे. बच्चू कडू यांचे कार्यकर्ते उपोषणस्थळी येत आहेत. दरम्यान आज मंत्री उदय सामंत हे देखील बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर आज बच्चू कडू काय भूमिका घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. दुपारी 2 वाजता मंत्री पंकजा मुंडे देणार बच्चू कडू यांच्या आंदोलनाला भेट देणार असल्याचे समजते.
बावनकुळेंनी केला मध्यस्थीचा प्रयत्न
प्रहारचे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आज 7 दिवस पूर्ण झाले आहेत. दरम्यान काल महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट देऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनावर अद्यापही ठाम आहेत, मात्र अतरी त्यावर का तोडगा निघणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक समिती गठीत करू व या समितीचा अहवाल आल्यावर कर्जमाफी करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. तर आज बच्चू कडू हे प्रहारचे प्रमुख पदाधिकारी व ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांच्याशी बोलणार असून आंदोलन सोडायचं की पुढे करायचं यावर निर्णय घेणार आहेत.
तसेच शेतकरी कर्जमाफी व बच्चू कडूंच्या इतर मागण्या संदर्भात उद्या सत्ता पक्ष वगळता,विरोधी पक्ष,शेतकरी संघटना,सामाजिक संघटना यांनी राज्यभरात रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.
बच्चू कडू यांच्या मागण्या काय ?
शेतमालाला MSP (किमान दर) वर 20% अनुदान द्यावे
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापन करून 10 लाखाची आर्थिक मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या
धनगर समाजाचे आरक्षण तात्काळ लागू करा
धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत 13 टक्के आरक्षण द्या
दिव्यांग आणि विधवा महिलांना 6000 रुपये मानधन द्या
शहरासारख्या ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना द्या
