
शितलकुमार मोटे, प्रतिनिधी, बार्शी : संपूर्ण राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. अशातच आता बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पॅनलने एकहाती विजय मिळवला आहे. 18 पैकी 18 जागेवर माजी आमदार राजेंद्र राऊत गटाचे उमेदवार विजयी झाले आहे. विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्या गटाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. 18 जागांपैकी 16 जागांवर निवडणूक झाली होती. त्याआधी 2 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती. माजी आमदार राजेंद्र राऊत गटाच्या कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत फटाके फोडत जल्लोष करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी या विजयानंतर म्हटले की, ‘या विजयाचे श्रेय मतदारांना जाते. बाजार समितीची ही निवडणूक सहकार क्षेत्रातील कठीण परीक्षा होती. सोसायटी, ग्रामपंचायत, आणि व्यापारी बांधवांनी सहकार्य केले. हमाल-तोलार मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली. या ताकतीच्या जीवावरती आज 18 पैकी 18 उमेदवार या ठिकाणी निवडून आले आहेत. आता आम्ही बार्शीच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत.’
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ‘विधानसभेतील पराभवानंतर जनतेमध्ये ही भावना होती की, राजूभाऊंना ताकद देणे गरजेचे आहे. थांबलेला विकास पुन्हा सुरू करण्यासाठी हे जनतेने दिलेले आशीर्वाद आहेत. ही निवडणूक प्रतिष्ठेची नसून जनतेच्या सेवेची लढाई होती. मी कधीही माझी प्रतिष्ठा पणाला लागली म्हणणार नाही किंवा अस्तित्वाची लढाई म्हणणार नाही. ही माझ्या बार्शी तालुक्यातील जनतेची जी मला सेवा करायची त्याची लढाई आहे.’
माजी आमदार राऊत पुढे बोलताना म्हणाले की, ‘भले एखादा कुठला अस्तित्व किंवा प्रतिष्ठेचा विषय असल्यास 10 पाऊल मागे घ्यायची वेळ आली तरी चालेल, परंतु या बार्शी तालुक्याचा विकास कधी थांबणार नाही. या तालुक्याचा विकास करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजित दादा आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणार आहे.’
राजेंद्र राऊत यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘बार्शी तालुक्यातील जनतेला विकासाची फार मोठी अपेक्षा आहे आणि तो विकास कोणाच्या माध्यमातून पूर्ण होतोय, संपूर्ण जनतेला पूर्ण माहिती आहे. केंद्र सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, आणि दादा या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून विकासाची कामे पूर्ण होतील. माझे सहकारी जीवाभावाचे मित्र जयभाऊ गोरे यांनी या ठिकाणी येऊन मला आधार देण्याचे काम केले. मी त्यांचे आभार मानतो.’