नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निकालाआधीच राऊत गटाची सरशी, 18 पैकी किती जागांवर विजयी? निकाल समोर
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास आघाडीचा दणदणीत विजय झाला आहे, तर विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्या परिवर्तन आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा विकास आघाडीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांनी विद्यमान आमदार दिलीप गंगाधर सोपल यांच्या बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडीचा दणदणीत पराभव केला. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच राऊत गटाने मोठी आघाडी घेत आतापर्यंत जाहीर झालेल्या 18 पैकी 7 जागांवर विजय निश्चित केला आहे. यातील 2 जागा बिनविरोध आहेत. सध्या ग्रामपंचायत सर्वसाधारण, आर्थिक दुर्बल घटक आणि हमाल-तोलार अशा सर्वच प्रमुख मतदारसंघांत बळीराजा विकास आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत बाजार समितीवरील सत्तांतर निश्चित केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 जागांसाठी ही निवडणूक झाली. यापैकी व्यापारी व आडते मतदारसंघातील 2 जागा बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित 16 जागांसाठी मतदान झाले होते. आतापर्यंत हाती आलेल्या अधिकृत निकालानुसार, बळीराजा विकास आघाडीने (राऊत गट) 18 पैकी किमान 7 जागांवर (बिनविरोध 2 सह) विजय मिळवला आहे, तर सोपल गटाला अद्याप एकही जागा जिंकता आलेली नाही. या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा विकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवत बाजार समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामुळे विद्यमान आमदार दिलीप गंगाधर सोपल यांच्या बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. सध्या मतमोजणी प्रक्रिया चार टेबलवर सुरू असून राऊत गटाने सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली. त्यामुळे त्यांचे उमेदवार निर्णायक मताधिक्याने विजयी झाले आहेत.
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल
| क्र. | मतदारसंघ | विजयी उमेदवार (राऊत गट) | पराभूत उमेदवार (सोपल गट) | मताधिक्य |
| 1 | ग्रामपंचायत (SC/ST) | सतीश हनुमंते | विनोद वाघमारे | 224 मतांनी |
| 2 | आर्थिक दुर्बल घटक | सचिन बुरगुटे | बाळासाहेब पिसाळ | 227 मतांनी |
| 3 | हमाल-तोलार | गजेंद्र मुकटे | प्रेम संतोष बागडे | 593 मतांनी |
| 4 | ग्रामपंचायत (सर्वसाधारण) | अजित बारंगुळे | सौदागर संकपाळ | 646 मतांनी |
| 5 | ग्रामपंचायत (सर्वसाधारण) | नेताजी धायतिडीक | आबासाहेब जगताप | 632 मतांनी |
| 6 | व्यापारी व आडते | भरतेश गांधी | – | बिनविरोध |
| 7 | व्यापारी व आडते | प्रवीण गायकवाड | – | बिनविरोध |
मोठा राजकीय धक्का
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हा बार्शीच्या स्थानिक राजकारणात सत्तापालट झाल्याचे स्पष्ट संकेत देत आहे. हा विजय राजेंद्र राऊत गटासाठी मोठा राजकीय आधार मानला जात आहे. तसेच या निकालामुळे आगामी काळात बार्शीच्या राजकारणाची दिशा बदलेल, असेही बोललं जात आहे. आमदार दिलीप सोपल यांच्यासाठी हा निवडणुकीतील पराभव एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
संपूर्ण बार्शी तालुक्यात उत्साह
दरम्यान माजी आमदार राजेंद्र राऊत गटाच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी हलगी वाजवत, गुलाल उधळत आणि ढोल-ताशांच्या गजरात जोरदार जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. बळीराजा विकास आघाडीने मिळवलेल्या या मोठ्या यशाचा उत्साह संपूर्ण बार्शी तालुक्यात दिसून येत आहे.
