बीड लोकसभा निवडणुकीत का झाला पंकजा मुंडे यांचा पराभव? जाणून घ्या कारण
Beed Loksabha election result 2024 : बीडच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. पंकजा मुंडेंच्या पराभवाची नेमकी कारणं काय आहेत. जाणून घेऊयात.
बीडमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपनं प्रितम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. भाऊ, मंत्री धनंजय मुंडेंनीही पूर्ण ताकद लावली. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजंरग सोनावणे यांनी पंकजा यांना निसटत्या पराभवाचा धक्का दिला. पंकजा मुंडे यांना 6 लाख 77 हजार 397 मतं मिळाली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणेंना 6 लाख 83 हजार 950 मतं मिळाली. फक्त 6 हजार 553 मतांनी बजरंग सोनावणे यांना पंकजा मुंडेंचा पराभव केला.
गेल्या विधानसभेत भाऊ धनंजय मुंडेंनीच पंकजा मुंडे यांना हरवलं. पण यावेळी समीकरणं बदलली तरीही पंकजा लोकसभेत काही जिंकू शकल्या नाही. आता पंकजा मुंडे का पराभूत झाल्या. कारण काय तेही पाहुयात.
- मराठा आंदोलन, जरांगे फॅक्टरचा फटका पंकजा मुंडेंना बसला.
- आंदोलन करुन आरक्षण मिळत नाही, असं वक्तव्य पंकजांना भोवलं.
- मराठा, मुस्लीम आणि दलित समाज एकत्रित आल्यानं पंकजांना फटका बसला.
- गेल्या 5 वर्षात पंकजा बीड जिल्ह्यात जनतेत फारशा गेल्या नाहीत.
- राष्ट्रवादीतल्या फुटीमुळं सहानुभूती शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत राहिली.
अवघ्या साडे 6 हजारांनी पंकजा पराभूत झाल्या. बीड लोकसभेच्या 6 विधानसभा मतदारसंघात मतांची आघाडी फक्त परळीतच मिळाली.
भाजपचे आमदार असलेल्या लक्ष्मण पवारांच्या गेवराई मतदारसंघात 39 हजार 096 मतांची आघाडी बजरंग सोनावणेंना मिळाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले प्रकाश सोळंकेंच्या माजलगावात 935 मतांची बजरंग सोनावणेंना आघाडी आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले संदीप क्षीरसागरांच्या बीडमध्ये 62 हजार 312 मतांनी बजरंग सोनावणेंना आघाडी मिळाली.
हीच आघाडी सोनावणेंसाठी निर्णायक ठरली. विशेष म्हणजे हे तिन्ही मतदारसंघ जरांगेंचा तालुका असलेल्या घनसावंगीच्या शेजारचे आहेत आष्टीत अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे आमदार आहेत. इथं 32 हजार 254 मतांनी सोनावणेंनाच आघाडी मिळाली. भाजपच्या नमिता मुंदडांच्या केजमध्येही 13 हजार 798 मतांनी सोनावणेंनीच आघाडी घेतली. पंकजा मुंडेंना, धनंजय मुंडे मंत्री असलेल्या परळीत फक्त आघाडी मिळाली आणि ही मोठी आघाडी आहे, तब्बल 74 हजार 834 मतांनी पंकजा आघाडीवर राहिल्या. पण ही आघाडी पंकजांना जिंकवण्यासाठी साडे 6 हजारांनी कमी पडली.
राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट मिळालं. पण पराभवाची साथ काही सुटताना दिसत नाही. मोदींची सभा होऊन, मंत्री धनंजय मुंडेसोबत असून आणि भाजपची यंत्रणा असतानाही, बजरंग सोनावणे यांनी पंकजांना पराभूत केलं.