फेसबुकवरची मैत्री नडली, मेडिकल ॲडमिशनपूर्वीच डॉक्टरला बसला लाखोंचा शॉक, विद्यार्थ्यासोबत काय घडलं?
बीडच्या केज पोलिसांनी एम.डी. मेडिसिन ॲडमिशनच्या नावाखाली ३.८६ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सौरभ कुलकर्णीला कराडमधून अटक केली आहे. आरोपीवर महाराष्ट्र, पंजाब आणि गुजरातमध्ये १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

बीडमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी उच्च पदवी (MD Medicine) मिळवून देण्याचे आमिष दाखवून डॉक्टर आणि विद्यार्थ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी केज पोलिसांना एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात यश आले आहे. सौरभ सुहास कुलकर्णी (नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने महाराष्ट्र, पंजाब आणि गुजरातसह विविध राज्यांत तब्बल ३ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नेमकं काय घडलं?
धारुर तालुक्यातील सोनीमोहा या ठिकाणी राहणारे डॉ. अविनाश रामचंद्र तोंडे (२७) हे बारामतीत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. आरोपी सौरभ कुलकर्णी याने एस.के. इज्युकेशन संस्था नावाच्या फेसबुक पेजवरून डॉ. तोंडे यांच्याशी संपर्क साधला. डॉ. तोंडे यांना एम.डी. मेडिसिनसाठी प्रवेश हवा होता. हे समजताच आरोपीने वर्धा येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. कॉलेजची नियमित फी ९९ लाख रुपये आहे. पण आपण केवळ ६५ लाख रुपयांत हे ॲडमिशन करून देऊ, असे आमिष त्याने दाखवले.
या आमिषाला बळी पडून डॉ. तोंडे यांनी सप्टेंबर २०२४ दरम्यान आरोपीला रोख आणि ऑनलाईन स्वरूपात एकूण ८ लाख रुपये दिले. मात्र, प्रवेशाच्या कोणत्याही यादीत नाव न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. जेव्हा त्यांनी पैशांची मागणी केली, तेव्हा आरोपीने पैसे देण्यास नकार देत त्यांना धमकावले. यानंतर धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि…
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम (IPS) तपासाची चक्रे वेगाने यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यावेळी तपासात धक्कादायक माहिती समोर आली. या आरोपीवर नाशिक, सोलापूर, जालना, नागपूर, पुणे, मुंबई, तसेच पंजाबमधील अमृतसर आणि गुजरातमध्येही फसवणुकीचे एकूण १५ गुन्हे दाखल होते. यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे केज पोलिसांच्या पथकाने सातारा जिल्ह्यातील कराड येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. या आरोपीने आणखी किती जणांना अशा प्रकारे लुटले आहे, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
