Dhananjay Munde: भावी कॅबिनेट मंत्री… धनंजय मुंडे यांच्या बॅनर्सने राजकीय वर्तुळात धुमशान… मंत्रिमंडळात स्थान मिळण्याच्या चर्चांना उधाण

Dhananjay Munde Poster Cabinet Minister: आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यात पोस्टर्स, बॅनर्स लागले आहेत. त्यावर भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख असल्याची त्याची राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे.

Dhananjay Munde: भावी कॅबिनेट मंत्री... धनंजय मुंडे यांच्या बॅनर्सने राजकीय वर्तुळात धुमशान... मंत्रिमंडळात स्थान मिळण्याच्या चर्चांना उधाण
धनंजय मुंडे, भावी कॅबिनेट मंत्री
| Updated on: Jul 14, 2026 | 10:33 AM

अशोक काळकुटे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: बीडच्या माजलगाव मतदारसंघात आ‌मदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले शुभेच्छा बॅनर्स सध्या राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरत आहेत. एका कार्यकर्त्याने लावलेल्या या बॅनर्सवर मुंडे यांचा उल्लेख ‘भावी कॅबिनेट मंत्री’ असा करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये झळकणाऱ्या या मजकुरामुळे नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. गेल्यावर्षी मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रिपद त्यांच्याकडे होते.

वाढदिवस साधेपणाने साजरा करणार

परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी 15 जुलै रोजी होणारा वाढदिवस साधेपणाने करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. वाढदिवशी कोणताही जल्लोष न करता समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मित्र परिवारासाठी त्यांन फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. आयुष्यातील काही प्रसंग असे असतात जे उत्सव साजरा करण्यापेक्षा समाजाप्रतीची जबाबदारीची जाणीव करून देतात. अजितदादांच्या अकाली निधनामुळे राज्य शोकाकूल आहे. जनेतच्या विकासासाठी आयुष्यभर झटणारा लोकनेता आपण गमावला आहे. तर कमी पावसामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरीक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत वाढदिवसाचा जल्लोष करणे योग्य वाटत नसल्याचे त्यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. यामुळे उद्या कोणत्याही प्रकारचे बॅनर, पोस्टर्स, होर्डिंग्ज, स्वागत कमानी, फटाक्यांची आतषबाजी, मिरवणुका अथवा इतर उत्सवी कार्यक्रम आयोजित न करण्याचे आवाहन आमदार धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

गेल्यावर्षी दिला होता राजीनामा

गेल्या वर्षी 4 मार्च, 2025 रोजी धनंजय मुंडे यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. नैतिकतेला धरून आणि तब्येत ठीक नसल्याचे कारण त्यांनी दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला होता. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप झाला होता. महाविकास आघाडीच नाही तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तर धनंजय मुंडे यांनी अगोदरच राजीनामा द्यायला हवा होता. शपथ घ्यायला नको होती अशी प्रतिक्रिया त्यावेळी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली होती. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातूनच मुंडे समर्थकांनी भावी कॅबिनेट मंत्री असे बॅनर लावल्याचे म्हटले जात आहे.

Follow Us