राज्य हादरलं; ओबीसी आरक्षण अन् मुलींच्या नोकरींच्या चिंतेने अजून एक आत्महत्या, बीडमध्ये बापाचं टोकाचं पाऊल

Beed OBC Reservation : ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये राज्यातील दुसरी आत्महत्येची घटना समोर येत आहे. त्यामुळे राज्य हादरलं आहे. पूर्वी मराठा आंदोलकांच्या आत्महत्या आणि आता ओबीसी आत्महत्यांमुळे समाजमन हेलावले आहे.

राज्य हादरलं; ओबीसी आरक्षण अन् मुलींच्या नोकरींच्या चिंतेने अजून एक आत्महत्या, बीडमध्ये बापाचं टोकाचं पाऊल
ओबीसी आरक्षण बचावासाठी अजून एक आत्महत्या
| Updated on: Sep 14, 2025 | 1:23 PM

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी आता दुसरा बळी गेल्याने समाजमन हेलावले आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील भरत कराड या रिक्षाचालकाने ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं. तर आता बीड जिल्ह्यातील गोरक्ष नारायण देवडकर यांनी ओबीसी आरक्षण आणि मुलीच्या नोकरीच्या चिंतेतून आत्महत्या केल्याचे नातेवाईक सांगत आहेत. मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती, नैराश्येतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. पूर्वी मराठा आंदोलकांच्या आत्महत्या आणि आता ओबीसी आत्महत्यांमुळे समाजमन हेलावले आहे.

बापाचं टोकाचं पाऊल

मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्यासाठी काढलेल्या जीआर नंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. अशात आता ओबीसी बांधवांकडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडच्या पिंपळनेर येथील गोरक्ष देवडकर यांनी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती. मात्र आता ओबीसीतलं आरक्षण संपत आहे या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांची मुलगी व नातेवाईकांनी सांगितले आहे.

आता माझी जबाबदारी कोण घेणार?

आता माझी जबाबदारी कोण घेणार? माझे वडील तर गेले आहेत अशी भावनिक प्रतिक्रिया आत्महत्या करणाऱ्या देवडकर यांच्या मुलीने दिली आहे. तिच्या या आर्त हाकेने अनेकांच्या काळजात चिर्रर झालं. सरकारने तत्काळ दखल घेतली पाहिजे अशी मागणी केली आहे. देवडकर यांच्या तीन मुलींचे लग्न झाले आहे. तर दोन मुली या पोलीस भरतीची तयारी करत आहेत. पती-पत्नी मोलमजूरी करुन संसाराचा गाडा ओढत होते. देवडकर यांच्या आत्महत्येमुळं कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.

मराठा आरक्षणासाठी अजून एकाचे टोकाचे पाऊल

बीड तालुक्यातील आहेर धानोरा येथील 39 वर्षीय संतोष अर्जुन वळे यांनी मराठा आरक्षण मिळत नसल्याची खदखद व्यक्त करत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. संतोष वळे हे मराठा आरक्षणाच्या अनेक आंदोलनात सहभागी झाले होते. शाळेत शिकणाऱ्या त्यांच्या दोन्ही मुलांना वारंवार आपल्याला मराठा आरक्षण भेटत नाही यामुळे येणारा काळ कठीण आहे असं म्हणायचे. ते सतत निराश असायचे यादरम्यान 2 सप्टेंबर रोजी त्यांनी विषारी औषध प्राशन केले यानंतर त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी पल्लवी वळे, दोन लहान मुलं, भाऊ, आई-वडिल असा परिवार आहे.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदारी येथील भरत कराड या 35 वर्षाय तरुणाने आत्महत्या केली. ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निराशेतून त्यांनी हे पाऊल टाकल्याचे कुटुंबियांचे म्हणणे होते. मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. तर यावेळी आमच्या आरक्षणात वाटा मागू नका असे आवाहन भुजबळांनी केले होते. आता अजून एक आत्महत्या झाल्याने राज्य हादरले आहे. तर कोणत्याही समाजातील व्यक्तींनी आत्महत्या करू नये असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.